बसवणकुडची येथे वनविभागाची कारवाई
बेळगाव : बेळगाव परिसरात वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री सुरू आहे. बसवणकुडची येथे हस्तिदंताची विक्री करण्यासाठी आलेल्या शिमोगा जिल्ह्यातील एका तरुणाला सीआयडी वनविभागाने अटक केली आहे. त्याच्याजवळून दोन हस्तिदंत जप्त करण्यात आले आहेत. बालाजी एस. (वय 28) रा. तावरघट्ट, ता. भद्रावती, जि. शिमोगा असे त्याचे नाव आहे. सीआयडी वनविभागाचे पोलीस उपअधीक्षक एम. एस. नायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस. आर. जोगन्नावर, हवालदार एस. आर. अरिबेंची, एस. एल. नाईक, एस. एस. रड्डी, बी. के. नागनुरी, यु. आर. पट्टेद, एम. ई. नाईक, आर. बी. कोरीकोप्प आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली. दि. 25 फेब्रुवारी रोजी बसवणकुडची बसथांब्याजवळ हस्तिदंताची विक्री करण्यासाठी बालाजी पोहोचला होता. याची माहिती मिळताच सीआयडी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला ताब्यात घेऊन दोन हस्तिदंत जप्त केले. त्याने ते कोठून आणले आहेत, याची चौकशी सुरू आहे. बालाजीवर वन्यजीवी संरक्षण कायदा 1972 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री रोखण्यासाठी प्रयत्न
बेळगाव परिसरात होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या अवयवांची विक्री रोखण्यासाठी वनखात्याबरोबरच सीआयडी वनविभागही कार्यरत आहे. असे प्रकार आढळून आल्यास 9480804133 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक एस. आर. जोगन्नावर यांनी केले आहे.









