अभिजात मराठीतर्फे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात डॉ. किरण ठाकुर यांचे उद्गार
बेळगाव : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आनंद साजरा करत न बसता भाषेच्या वाढीसाठी भविष्यात प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या इंग्रजीचे मराठीसमोर आव्हान असले तरी चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा सुरू केल्यास मराठीतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच वाढेल. तसेच मराठीला नवी उभारी मिळेल. फक्त शिक्षण क्षेत्रात राजकारणाला थारा देऊ नका असे उद्गार लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. अभिजात मराठी संस्थेच्यावतीने शुक्रवारी आयोजित कृतज्ञता सोहळ्यात डॉ. किरण ठाकुर बोलत होते.
व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष संध्या देशपांडे, डॉ. विनोद गाय्0ाकवाड, आप्पासाहेब गुरव, सुहास सांगलीकर व अनंत लाड उपस्थित होते. ते पुढे म्हणाले, लहान मुले आपल्या संवादामध्ये अधिकाधिक मराठी शब्द वापरतील तेव्हाच ही भाषा अनेक वर्षे टिकेल. त्यामुळे प्रत्येक गावात लहान मुलांसाठी वाचनालये उघडावी लागतील. त्यांच्यामध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी लागेल असे डॉ. किरण ठाकुर यांनी सांगितले. कार्यक्रमात अभिजात मराठी आनंद सोहळा साजरा करण्यासाठी विविध संस्था तसेच व्यक्तींनी आर्थिक मदत केली. त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बेळगावमधील सहकारी संस्था तसेच व्यक्तींचा सत्कार झाला. सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले. आप्पासाहेब गुरव यांनी उपस्थितांचे आभार मानले.









