प्रवाशांची गैरसोय दूर : परिवहन मंडळांना आर्थिकदृष्ट्या समाधान
बेळगाव : बसवाहक वादावरून ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा पूर्ववत झाली आहे. शुक्रवारी ही बससेवा पूर्ण क्षमतेने पुन्हा एकदा विविध मार्गांवर मार्गस्थ झाली आहे. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे. बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकातून कोल्हापूरसह इतर मार्गावरही बसेस धावल्या. शिवाय महाराष्ट्राची लालपरीही विविध मार्गांवर पूर्ववत झाली आहे. कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा सुरळीत झाल्याने दोन्ही राज्यांच्या परिवहनना आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. बसवाहक वादावादीच्या प्रकरणानंतर दोन्ही राज्यांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान दोन्ही राज्यांची बससेवा ठप्प होऊन आर्थिकदृष्ट्या फटकाही बसला होता. मात्र आता हळूहळू आंतरराज्य बससेवा पुन्हा एकदा मार्गावर धावू लागली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहनचा महसूलही पूर्ववत होऊ लागला आहे.
बेळगाव आणि कोल्हापूर येथील जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक झाली. या बैठकीत आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. शिवाय दोन्ही राज्यांमध्ये बससेवेत कोणताही अडथळा येणार नाही याबाबतही खबरदारी घेण्यात आली. शिवाय दोन्ही राज्यांतील स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आंतरराज्य बससेवा पुन्हा एकदा नव्या जोमाने मार्गस्थ झाली आहे. बेळगाव बस स्थानकातून कोल्हापूर, सांगली, मिरज, सातारा, नाशिक, मुंबई यासह कोकणात बससेवा सोडण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. तसेच महाराष्ट्राच्या विविध आगारातून लालपरी कर्नाटकच्या विविध भागात धावू लागली आहे. बेळगाव, निपाणी, संकेश्वर आदी ठिकाणी लालपरी पूर्ववत झाली आहे. त्याबरोबर प्रवाशांच्या संख्येनुसार बसफेऱ्याही वाढविण्यात आल्या आहेत.









