निजलिंगप्पा साखर संस्थेचा उपक्रम : मंत्री शिवानंद पाटील यांची बैठकीत माहिती
बेळगाव : येथील एस. निजलिंगप्पा साखर संस्थेमार्फत साखर तंत्रज्ञान विषयात एम. एस्सी. कोर्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती साखर उद्योगमंत्री शिवानंद पाटील यांनी दिली. बेंगळूर येथे शुक्रवारी झालेल्या संस्थेच्या संचालक मंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ऊस उत्पादकांच्या हितासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
बेळगावनजीकच्या बेनकनहळ्ळी येथे साखर-मद्य संशोधन केंद्र सुरू करणे व इच्छुकांना साखर-तंत्रज्ञानामध्ये पीएचडी करण्यासाठी संधी मिळवून देणे यावर बैठकीत निर्णय झाला. साखर-तंत्रज्ञानात पीएचडी करण्यासाठी महाविद्यालय सुरू करणे व महाविद्यालय उभारण्यासाठी 15 कोटी रुपये निधीची गरज असून सध्या 5 कोटी रुपये राखून ठेवण्याचा निर्णय बैठकीत झाला. महाविद्यालय राणी चन्नम्मा विद्यापीठाशी सलग्न ठेवण्यात येईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
ऊस पीक आगीच्या भक्ष्यस्थानी पडून नुकसान झाल्यास संस्थेमार्फत भरपाई देण्यासाठी कॉर्पस फंड स्थापन करण्याचा निर्णयही बैठकीत झाला. ऊस उत्पादक व साखर उद्योजक यांच्यासाठी दुर्घटनेच्या काळात योग्य भरपाईसाठी मार्गसूची तयार करण्यात येईल, असे मंत्री पाटील म्हणाले. उसाचे उत्पादन दर्जेदार व मोठ्या प्रमाणात घेण्यासाठी शेतकऱ्यांना उसाचे उत्तम दर्जाचे तरू वितरण करण्यात यावेत. तसेच अधिक उतारा देणाऱ्या उसाचा निजलिंगप्पा संस्थेमार्फत विकास घडवून आणण्याचा निर्णय बैठकीत झाला.
साखर कारखाने वर्षभरात केवळ 90 दिवस चालू राहिल्यास त्यांना लाभ मिळणे कष्टप्रद आहे. त्यामुळे किमान 150 दिवस तरी साखर कारखाने कार्यरत राहिले पाहिजे. ऊसगाळप संपल्यानंतर उपउत्पादन तयार करण्याच्या कामात कारखान्यांनी सुरुवात केली पाहिजे. तरच कारखान्यांना लाभाचे होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सल्ला-सूचना देण्याच्या उद्देशाने देशाच्या विविध संशोधन केंद्रातील तज्ञांना एस. निजलिंगप्पा संस्थेमार्फत निमंत्रित करण्यात येईल, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले. बैठकीला संचालक सत्यजीत पाटील, सी. बी. पाटील, अधिकारी रमणदीप चौधरी, रवीकुमार, राजगोपाल आदी उपस्थित होते.
भरपाई देण्यासाठी कॉर्पस फंडची स्थापन
आगीसारख्या दुर्घटनेत ऊस पिकाचे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्याला भरपाई देण्यासाठी एस. निजलिंगप्पा साखर संशोधन संस्थेमार्फत कॉर्पस फंड स्थापन करण्यात येईल. भरपाई देण्यासाठी लवकरच मार्गसूची तयार करण्यात येणार आहे, अशी माहितीही देण्यात आली.
कारखान्यांची पुरस्कारासाठी निवड
तांत्रिक क्षमतेनुसार प्रत्येक वर्षी साखर कारखान्यांना पुरस्कार देण्यात येईल. साखर कारखान्यांनी प्रति वर्षी सादर केलेल्या अहवालानुसार तसेच ऊस उत्पादकांना वितरण केलेल्या बिलाचा विचार करून कारखान्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल.
– मंत्री शिवानंद पाटील









