महापालिकेतील परिस्थिती : निविदा काढण्याचा निर्णय
बेळगाव : शहरातील कचरा उचल करण्यासाठी महापालिकेच्या ताफ्यात सध्या एकूण 125 वाहने कार्यरत असली तरी त्यावर केवळ 52 वाहनचालक उपलब्ध आहेत. उर्वरित वाहनांवर आरोग्य निरीक्षक आवश्यकतेनुसार एखाद्या परवानाधारक चालकाची नियुक्ती करतात, असे आरोग्य विभागाच्यावतीने स्थायी समिती बैठकीत सांगण्यात आले. यावर पर्याय म्हणून उर्वरित वाहनांवर चालकांची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. शहरातील 58 प्रभागांपैकी काही प्रभागांमध्ये कचऱ्याची उचल होत नसल्याची ओरड आहे. तसेच घंटागाडी वेळेवर येत नसल्याच्या तक्रारीदेखील येत असल्याचे आरोग्य स्थायी समिती बैठकीत सदस्यांनी सांगितले. यावेळी महापालिकेच्या ताफ्यात एकूण 165 कचरावाहू वाहने असली तरी सध्या 125 वाहने कार्यरत आहेत. मात्र, वाहनांच्या तुलनेत चालकांची संख्या कमी असून केवळ 50 चालक सध्या काम करत आहेत, असे सांगण्यात आले. त्यामुळे तातडीने चालकांची नियुक्ती होणे गरजेचे असून त्यासाठी निविदा मागविण्याची गरज असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे निविदा काढण्याला हिरवा कंदील दर्शविण्यात आला.
सदाशिवनगर स्मशानभूमीत कामगारांची नियुक्ती करा
सदाशिवनगर स्मशानभूमीत सध्या केवळ दोनच कर्मचारी कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिरिक्त कामगारांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी सदस्य नितीन भातकांडे यांनी केली. मात्र, स्मशानभूमीत दोन कामगार नसून चार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन टप्प्यात कर्मचारी कार्यरत असल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले.
व्यापार परवान्यांच्या माध्यमातून 1 कोटी 46 लाखांचा महसूल
व्यापार परवान्यांच्या माध्यमातून 2 कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. पण चालू आर्थिक वर्षात 1 कोटी 46 लाखांचा महसूल जमा झाला आहे, असे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितले. आर्थिक वर्ष संपण्यास एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने उर्वरित उद्दिष्ट देखील साध्य केले जाईल, असे सांगितल्यानंतर अध्यक्ष व सदस्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले.
दक्षिण व उत्तर विभागासाठी दोन फॉगिंग मशीन
दक्षिण आणि उत्तर विधानसभा मतदारसंघांसाठी दोन मोठ्या फॉगिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याबाबत अहवाल सादर करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. याबाबत आजच्या बैठकीत ठराव मांडण्यात आला. तसेच शहरातील लहान नाल्यांची पावसाळ्यापूर्वी सफाई करण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली.
कुत्र्यांच्या निर्बिजीकरण निविदेला प्रतिसाद नाही
शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा मागविण्यात आली होती. मात्र, त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच फेरनिविदा काढण्यात येणार आहे, असे आरोग्याधिकारी डॉ. नांद्रे यांनी सांगितले. त्याचबरोबर मोकाट जनावरे पकडण्याची जबाबदारी असलेल्या राजू संकण्णावर यांच्याबाबत लोकांमधून तक्रारी येत असून गरज भासल्यास त्यांना कमी करून त्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, असे बैठकीत सूचित करण्यात आले.









