वृत्तसंस्था / वेलिंग्टन
न्यूझीलंड आणि लंका महिला क्रिकेट संघामध्ये होणाऱ्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतून न्यूझीलंडची फलंदाज बेला जेम्सने दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
बेला जेम्सची ही दुखापत उजव्या पायाला झाली असून तिला ही दुखापत बरी होण्यासाठी किमान 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागेल. आता क्रिकेट न्यूझीलंडने या वनडे मालिकेसाठी बेला जेम्सच्या जागी लॉरेन डाऊनची संघात निवड केली आहे. गेल्यावर्षी ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध झालेल्या वेलिंग्टनमधील सामन्यात बेला जेम्सने वनडे क्रिकेट पदार्पण केले होते. त्या मालिकेमध्ये जेम्सने 2 सामन्यातून 51 धावा जमविल्या होत्या. लंका आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील वनडे मालिकेतील पहिला सामना 4 मार्चला नेल्सनमध्ये होणार असून त्यानंतरचे दोन सामने नेपीयरमध्ये खेळविले जातील. या वनडे मालिकेनंतर उभय संघामध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका 14 ते 18 मार्च दरम्यान होणार आहे.









