‘आप’च्या कारभाराची चिरफाड : सोमवारी सभागृहात चर्चा शक्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आरोग्य विभागाशी संबंधित कॅग अहवाल शुक्रवारी विधानसभेत सादर केला. 7 पानांच्या या अहवालात दिल्लीत आरोग्य पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे म्हटले आहे. परिचारिका आणि डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही. महिला आरोग्य कार्यक्रमांना कमी निधी दिला जातो. रुग्णवाहिकेत आवश्यक उपकरणे नाहीत. आयसीयूची कमतरता आहे, असे अनेक ठपके ठेवण्यात आले आहेत. या अहवालावर सोमवारी सभागृहात चर्चा होईल. यापूर्वी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी 25 फेब्रुवारी रोजी दिल्ली मद्य धोरणावरील कॅग अहवाल सभागृहात सादर केला. ‘आप’च्या चुकीच्या पवित्र्यामुळे 2002 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका त्यात ठेवण्यात आला होता.
दिल्लीतील किमान 21 मोहल्ला क्लिनिकमध्ये शौचालये नाहीत. रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. मोठ्या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना बराच वेळ वाट पहावी लागते. याशिवाय, कोविड-19 दरम्यान केंद्र सरकारने दिल्ली सरकारला दिलेली रक्कम वापरली गेली नाही, असे बरेच मुद्दे कॅगच्या अहवालात उपस्थित करण्यात आले आहेत. कोविड दरम्यान केंद्र सरकारने दिलेल्या 787.91 कोटी रुपयांपैकी आप सरकार फक्त 582.84 कोटी रुपये वापरू शकले. त्याचबरोबर पीपीई किट, मास्क आणि औषधांसाठी जारी केलेल्या 119.85 कोटी रुपयांपैकी 83.14 कोटी रुपये वापरले गेले नाहीत, असेही निदर्शनास आले आहे.
मोहल्ला क्लिनिकमध्ये मूलभूत गरजाही पुरविण्यात आल्या नव्हत्या. 21 क्लिनिकमध्ये शौचालये नव्हती, 15 क्लिनिकमध्ये वीज नव्हती आणि 6 क्लिनिकमध्ये टेबलही नव्हते असे आढळून आले आहे. जानेवारी 2025 पर्यंत दिल्लीतील 70 विधानसभा मतदारसंघांमध्ये 546 मोहल्ला क्लिनिक होते, असे आकडेवारी सांगते. आयुष दवाखान्याचीही अवस्था अशीच होती. 49 दवाखान्यांपैकी 17 दवाखान्यांमध्ये वीज नव्हती, 7 केंद्रांमध्ये शौचालयांची सुविधा नव्हती आणि 14 केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नव्हती, असे आढळून आले आहे.
रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता असूनही केवळ 1,357 बेड वाढवण्यात आले. तथापि, सरकारने 2016-17 ते 2020-2021 या कालावधीत एकूण 32 हजार बेड वाढवण्याचे आश्वासन दिले होते. आप सरकारच्या काळात फक्त तीन नवीन रुग्णालये बांधण्यात आली. यामध्ये, तिसऱ्या रुग्णालयाची खर्च निविदा खूपच जास्त असल्याचेही स्पष्ट झाले आहे.









