दापोली :
समुद्री कासवांची अर्थात ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची दापोली किनाऱ्यांवर या वर्षी 13,994 अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये आंजर्ले व दाभोळ येथे एकूण 229 पिल्लांचे समुद्रात जलार्पण करण्यात आल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.
तालुक्यात यावर्षी दाभोळ येथे 65 घरटी मिळाली असून यात 6281 अंडी संरक्षित करण्यात आली. यातील 179 पिल्लांना तसेच आंजर्ले येथील 11 घरट्यांमध्ये 1,311 अंडी संरक्षित करण्यात आली होती. त्यातील 50 पिल्लांना समुद्राच्या प्रवाहात सोडण्यात आले.
आतापर्यंत कोळथरे येथे 30 घरटी सापडून आली असून यामध्ये 2964, मुरुड येथील एका घरट्यात 135, लाडघर येथील 3 घरट्यांमध्ये 296, कर्दे येथील 7 घरट्यांमध्ये 771, तर केळशी येथील 17 घरट्यांमध्ये 1736 अंडी अशी एकूण 134 घरटी सापडून आली असून यात 13,494 अंड्यांचे कांदळवन विभागामार्फत कासवमित्रांच्या मदतीने संरक्षित करण्यात आली आहेत. यातील 229 पिल्ले नुकतीच समुद्राच्या प्रवाहात सोडण्यात आली असून उर्वरीत अंड्यातून देखील पिल्ले आता हळूहळू बाहेर येत असल्याचे कांदळवन विभागाकडून सांगण्यात आले.
समुद्रात कासवांची पिल्ले सोडतानाचा नजारा पहाण्यासारखा असतो. यासाठी दापोलीत अनेक पर्यटक व पर्यावरणप्रेमी दरवर्षी गर्दी करतात. यामुळे दापोलीत मोठी आर्थिक उलाढाल देखील होते.








