खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर
बेळगाव : गोंधळी गल्ली येथील एका युवकावर चाकूहल्ला करण्यात आला.सीमकार्ड व आर्थिक व्यवहारातून गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून यासंबंधी खडेबाजार पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. युवकाच्या डाव्या मांडीला दुखापत झाली आहे. सुरेश भिवा वारंग (वय 49, रा. गोंधळी गल्ली) असे त्याचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास यंदे खूटजवळ ही घटना घडली आहे. यासंबंधी निखील प्रकाश कुरणे (रा. गोंधळी गल्ली) याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.
गुरुवार दि. 27 फेब्रुवारी रोजी निखिलला दिलेले पैसे मागण्यासाठी सुरेश व त्याची पत्नी निखिलच्या घरी गेले होते. त्यावेळी निखिल घरात नव्हता. दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास यंदे खूटजवळ सुरेश निखिलला भेटला. त्यावेळी शिवीगाळ करीत पैसे मागण्यासाठी माझ्या घरी जातोस का? अशी विचारणा करीत निखिलने सुरेशला मारहाण केली. त्यानंतर त्याच्या डाव्या मांडीवर चाकूने हल्ला करण्यात आला. सुरुवातीला निखिलने सुरेशला हाताने मारहाण केली. त्याला चुकवून पळून जाताना पाठलाग करीत त्याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक श्रीशैल गाबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली. जखमी सुरेशकडून माहिती घेण्यात आली. चाकूहल्ला करणाऱ्या निखिल कुरणेचा शोध घेण्यात येत आहे. निखिलने सुरेशचा मोबाईल आपल्याकडे घेऊन त्याच्यातील सीमकार्ड काढून घेतले होते. 1500 रुपयेही त्याने घेतले होते. याच मुद्द्यावरून ही घटना घडली आहे.









