विद्यापीठे बंद करीत असल्याने संताप
बेळगाव : राज्यातील नऊ विद्यापीठे बंद करण्याचा घाट राज्य सरकारने घातला आहे. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्यावतीने (अभाविप) राज्यभर भीक मागून आंदोलन केले जात आहे. गुरुवारी राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस व आंदोलनकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. विद्यापीठे बंद होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. राज्य सरकार कोणतेही कारण न देता ही विद्यापीठे बंद करीत आहे. याविरोधात राज्यभर आंदोलन करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या घरासमोर आंदोलन छेडण्यात आले. मंत्री हेब्बाळकर या घरात नसल्याने त्यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांनी आंदोलकांशी चर्चा केली. विद्यापीठे चालविण्यासाठी सरकारकडे पैसा नसेल तर राज्यभर भीक मागून पैसा उभा केला जाईल, असा इशारा देण्यात आला. मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करू नये, अशी विनंती पोलिसांनी आंदोलकांना केली. परंतु आंदोलन करण्यावर कार्यकर्ते ठाम असल्याने पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांनी घरासमोर आंदोलन करून निवेदन दिले. यावेळी अभाविपचे ज्येष्ठ कार्यकर्ते पृथ्वीकुमार, कुशल घोडगेरी, रोहित अलकुंटे, सचिन हिरेमठ यांसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









