बेळगाव वनमध्ये सुविधा ठप्प : तातडीने सुरू करण्याची मागणी
बेळगाव : मागील दोन महिन्यांपासून आधारकार्ड वितरण आणि दुरुस्तीची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होऊ लागली आहे. केवळ पोस्ट कार्यालयात आधारकार्ड संबंधीची कामे केली जात आहेत. मात्र याठिकाणी गर्दी होत असल्याने लाभार्थ्यांचे हाल होऊ लागले आहेत. त्यामुळे बेळगाव वन कार्यालयात आधारकार्ड संबंधीची कामे तातडीने सुरू करावीत, अशी मागणी होत आहे. नवीन आधारकार्ड वितरण आणि दुरुस्ती प्रक्रिया थांबल्याने अनेकांना शासकीय सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. विशेषत: वयोवृद्ध दिव्यांग नागरिकांच्या आधारकार्डची दुरुस्ती होत नसल्याने मासिक पेन्शन ठप्प झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
बेळगाव शहरात आठ ठिकाणी बेळगाव वन कार्यालये आहेत. मात्र सर्व ठिकाणी आधारकार्डसंबंधीची कामे ठप्प झाली आहेत. केवळ पोस्ट कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र याठिकाणी गर्दी होत असल्याने लाभार्थ्यांना आधारकार्डसाठी आठ दिवस फेऱ्या माराव्या लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आधारकार्ड नको म्हणण्याची वेळ आली आहे. लहान बालकांचे नवीन आधारकार्ड काढणेही पूर्णपणे थांबले आहे. त्याचबरोबर नावात बदल, पत्त्यात बदल, मोबाईल आणि इतर दुरुस्तीही होईनाशी झाली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांचे आधारकार्डसाठी हाल होताना दिसत आहेत. आधारकार्ड वितरण आणि दुरुस्तीची प्रक्रिया बेळगाव वन कार्यालयात पूर्ववतपणे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.









