नागरिकांतून नाराजी : विविध ठिकाणी कचरा पेटविण्याच्या प्रमाणात वाढ
बेळगाव : एकीकडे कचरा वर्गीकरणासाठी महापालिकेकडून जोरदार प्रयत्न सुरू असतानाच काही ठिकाणी मात्र कचरा पेटविण्याच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. शहरासह उपनगरात मनपाच्या कर्मचाऱ्यांकडून कचरा पेटविला जात आहे. कचरा वर्गीकरण करण्याऐवजी पेटविला जात असल्याने प्रदूषण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शहरातील मुख्य बाजारापेठ त्याचबरोबर विविध ठिकाणच्या ओल्या आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण केले जात आहे. मात्र दुसरीकडे शहर आणि उपनगरात विविध ठिकाणी कचरा पेटविला जात आहे. महापालिकेच्या कामगाराबरोबरच नागरिकांकडूनही कचरा पेटविला जात आहे. कचरा कुंडी नसलेल्या खुल्या ठिकाणी टाकण्यात आलेला कचरा उचल करण्याकडे दुर्लक्ष झाल्यास असे प्रकार घडत आहेत.
सध्या शहरात कचरा वर्गीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. प्रत्येक घरातून ओला, सुका व प्लास्टिक कचरा वेगळा करून दिला जात आहे. मध्यंतरी कचऱ्याचे वर्गीकरण करून न दिल्यास कचऱ्याची उचल केली जात नव्हती. कचऱ्याच्या उचलीसाठी घंटागाडी असतानाही अनेक जण रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. शहरात दररोज 190 ते 220 टन कचरा जमा होतो. त्यातील ओल्या कचऱ्यावर तुरमुरी येथील घनकचरा प्रकल्पात प्रक्रिया केली जाते व त्यातून कंपोस्ट खत तयार केले जाते. प्लास्टिक व काही प्रमाणात सुका कचरा सिमेंट कंपन्यांना पाठविला जातो. शहरात 28 प्रभाग असून त्यापैकी 47 प्रभागांच्या स्वच्छतेचा ठेका आहे. उर्वरित प्रभागात महापालिकेचे सफाई कामगार स्वच्छतेचे काम करतात. पहाटे पाचपासूनच कचरा उचलण्याचे काम सुरू होते. कचरा पेटविणे बेकायदेशीर असतानाही काही ठिकाणी कचरा पेटविण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.









