रणजी ट्रॉफी फायनल : केरळच्या दुसऱ्या दिवसअखेरीस 3 बाद 131 धावा : आदित्य सरवटेचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था/नागपूर
विदर्भ क्रिकेट असोशिएनच्या मैदानावर खेळवल्या जात असलेल्या केरळविरुद्ध रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात विदर्भाने पहिल्या डावात 379 धावा केल्या. यानंतर केरळची पहिल्या डावात खराब सुरुवात झाली असून दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा त्यांनी 3 बाद 131 धावा केल्या होत्या. अद्याप ते 248 धावांनी पिछाडीवर असून दिवसअखेरीस आदित्य सरवटे 66 तर कर्णधार सचिन बेबी 7 धावांवर खेळत होते. प्रारंभी, केरळने नागपूरच्या व्हीसीए स्टेडियमवर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विदर्भाच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर पार्थ रेखाडेला भोपळाही फोडता आला नाही. ध्रुव शोरे 16 तर दर्शन नळकांडे 1 धावा काढून बाद झाला.
यावेळी विदर्भाची 3 बाद 24 अशी स्थिती झाली होती. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मालेवार आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करुण नायरने 215 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली व संघाचा डाव सावरला. मालेवारने चालू मोसमातील दुसरे शतक झळकावताना केरळच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने 285 चेंडूत 15 चौकार व 3 षटकारासह 153 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. करुण नायरने 86 धावांची खेळी करत त्याला मोलाचे योगदान दिले. नायर बाद झाल्यानंतर मालेवारने पुढे संयमी खेळी करत आपले दीडशतक साजरे केले, पण दीडशतकानंतर मात्र तो लगेच बाद झाला.
विदर्भाच्या तळाच्या फलंदाजांना मात्र अपेक्षित कामगिरी करता आली नाही. कर्णधार अक्षय वाडकर 23, अक्षय कर्नेवार 12, नचिकेत बुटे 32 धावा काढून बाद झाले. विदर्भ संघाने गुरुवारी 254/4 च्या धावसंख्येपासून खेळण्यास सुरुवात केली. पण त्यांना केवळ 125 धावा करता आल्या आणि शेवटच्या 6 विकेट गमावल्या. केरळकडून एमडी निधीश आणि एडन अॅपल यांनी 3-3 विकेट घेतल्या. नेदुमंकुझी तुलसीने 2 विकेट घेतल्या. जलज सक्सेनाने 1 विकेट घेतली.
केरळची दमदार सुरुवात,सरवटेचे नाबाद अर्धशतक
विदर्भाचा पहिला डाव 379 धावांत आटोपल्यानंतर केरळच्या पहिल्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रोहन कुनुमलला भोपळाही फोडता आला नाही. अक्षय चंद्रन 14 धावा काढून माघारी परतला. यावेळी मुळचा विदर्भाचा पण सध्या केरळ संघाकडून खेळणाऱ्या 35 वर्षीय आदित्य सरवटेने अहमद इम्रानला सोबतीला घेत संघाला सावरले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी साकारली. आदित्य सरवटेने 120 चेंडूत 10 चौकारासह नाबाद 66 धावांची खेळी साकारली. त्याला इम्रानने 37 धावांची खेळी करत चांगली साथ दिली. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असतानाच इम्रानला यश ठाकूरने बाद करत केरळला मोठा धक्का दिला. यानंतर दिवसअखेरीस सरवटे व कर्णधार सचिन बेबी यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केरळने 39 षटकांत 3 गडी गमावत 131 धावा केल्या होत्या. विदर्भाकडून दर्शन नळकांडेने 2 तर यश ठाकुरने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विदर्भ पहिला डाव सर्वबाद 379 (मालेवार 153, करुण नायर 86, नचिकेत भुटे 32, निधीश व एडन प्रत्येकी तीन बळी)
केरळ पहिला डाव 39 षटकांत 3 बाद 131 (आदित्य सरवटे खेळत आहे 66, सचिन बेबी खेळत आहे 7, इम्रान 37, नळकांडे 2 बळी, यश ठाकुर 1 बळी).









