विश्वविक्रमासह विविध राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित
मैदानी खेळांची लहानपणापासून आवड असणे गरजेचे आहे. सध्या मैदानी खेळ कमी आणि मोबाईलवरील खेळ अधिक दिसून येत आहेत. मात्र लहानपणापासून मैदानाकडे वळत स्केटींग या खेळ प्रकारात रत्नागिरी जिह्यातील दापोलीचा झेंडा घेवून स्वराली दळवी हिने राष्ट्रीय स्तरापर्यंत झेप घेतली आहे. दापोलीतील पालवणी गावातील रहिवासी असलेली स्वराली दळवी हिने स्केटींग या खेळाचा एक भाग बनत लहान वयातच आपले खेळामधील कर्तृत्व दाखवून दिले आहे. तालुक्यावरून तिने राष्ट्रीय स्तरावर आपले नाव नोंदवले आहे. स्वराली दळवी ही सरस्वती विद्यामंदिर (सीबीएसई) दापोली येथे दहावीमध्ये शिक्षण घेत आहे. वडील सत्यवान दळवी हे क्रीडा शिक्षक व आई सायली दळवी सुद्धा शिक्षिका असल्याने तिच्या मनात क्रीडा प्रकारांमध्ये सहभागाची गती मिळाली. त्यात तिने स्केटींग या प्रकारात सहभाग नोंदवला व अनेक पुणे, दिल्ली अशा मोठ्या राज्यांमध्ये जाऊन राष्ट्रीय स्तरापर्यंत आपल्या खेळाने दापोली तालुक्याचा व रत्नागिरी जिह्याचा झेंडा फडकवला. जिल्हास्तर, राज्यस्तर, राष्ट्रीय स्तरावर स्केटींग प्रकारात सहभाग घेवून सन्मानचिन्हे, मेडल, पुरस्कार प्रमाणपत्रे आपल्या पदरात पाडून घेतली. स्वराली हिने पुणे येथे झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून अनेकवेळा विश्वविक्रम केला.
ईगल स्केटर्स या ग्रुपमधून ती या स्पर्धेत सहभागी झाली होती. यापूर्वी तिने मिरज येथील भानुदास स्टेडियम येथे झालेल्या सलग सात तास रिव्हर्स स्केटींग यामध्ये एशियन विक्रम केला. तसेच 2020 मध्ये स्वरालीला फिनिक्स राष्ट्रीय क्रीडारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच स्वरालीला फोनिक्स स्पोर्टस् अॅन्ड कल्चरल अॅक्टिव्हिटी फाउंडेशनतर्फे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीची दखल घेवून फोनिक्स राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वरालीने या स्केटींग प्रकारात गिनिज रेकॉर्ड तर एकवेळा एशियन रेकॉर्ड केला आहे. चिपळूण-सावर्डे येथे श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटी ट्रस्ट स्पोर्टस अॅकॅडमीकडून आयोजित स्केटींग रेसमध्ये देखील तिने यश मिळवून आपल्या यशाची पताका फडकवली. अपयशाला न घाबरता आपण पुढे गेलो तर यश आपली वाट पाहत असतो, असे तिने ‘तऊण भारत संवाद‘शी बोलताना आवर्जून सांगितले. आपण केलेली ही आता कुठे सुरूवात आहे. आपल्याला अजून मोठे खेळाडू व्हायचे असल्याचे देखील ती सांगते. या यशाबद्दल स्वराली आपले वडील सत्यवान दळवी व स्केटींग प्रशिक्षक प्रथमेश दाभोळे तसेच तायक्वाँदो प्रशिक्षिका प्राजक्ता माने यांची नावे आवर्जून सांगते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली दरवेळी सरावही करते. महाराष्ट्र राज्य पुणे क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्फे आयोजित जिल्हास्तरावरील स्पर्धेतही तिने विशेष यश संपादन केले. स्वराली ही पाचव्या वर्षापासूनच स्केटिंग या क्रीडा प्रकारात सहभाग घेत आहे. सध्या ती 10 वी मध्ये शिक्षण घेत असून स्वरालीला गुप्तचर विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न आहे.
स्वरालीला स्केटिंग खेळाबरोबरच तायक्वाँडो, लाठी-काठी, सायकलिंग व मोठ्या प्रमाणात कब•ाr या मैदानी खेळांची आवड आहे. तायक्वाँदो राज्यस्तरावर खेळली आहे. तसेच अभ्यासाबरोबरच गाण्याची व हार्मोनियम वाजवण्याची आवड आहे. गाण्याची पहिली परीक्षा उत्तीर्ण होऊन तिची दुसऱ्या परीक्षेची तयारी सुरू आहे. स्केटींगमध्ये चढ किंवा उतार अगदी व्यवस्थित तोल सांभाळून पार करू शकतो. रिंग, स्पीड, आर्टिस्टिक, फिगर स्केटिंग असे प्रकार या खेळात आहेत. रोलर स्केटिंगमध्ये आईस स्केटिंग, आईस हॉकी, आईस फिंगर, आईस स्किलिंग, आईस स्केट बोर्ड, रोलर हॉकी, रोलर स्केटिंग, रिंग स्केट, इन लाईन स्केटिंग, इन लाईन हॉकी असे प्रकार समाविष्ट असल्याचे स्वराली हिने सांगितले.
-प्रतिक तुपे, दापोली









