खेड :
तालुक्यात भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने केलेल्या सर्वेक्षणानुसार तालुक्यातील पाणी पातळी 3.13 मीटर इतकीच आहे. तालुक्यात यंदा 17 गावे 44 वाड्यांची टंचाई आराखड्यात नोंद करण्यात आली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यातच पाण्याचा पहिला टँकर धावण्याची शक्यता आहे. त्यातच रखरखत्या उन्हामुळे भूजल पातळीतही घट झाल्याने पाणीटंचाईची तीव्रताही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यात वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर असतो. कडक उन्हामुळे उपलब्ध पाण्याचे स्त्रोत आटत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागवली जात असली तरी जेमतेम पाणीच मिळत असल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यातच रणरणत्या उन्हामुळे भूजल पातळीतही कमालीची घट होत असल्याने पाणीटंचाईत नवी भर पडते. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने तालुक्यातील विहिरी सर्वेक्षणासाठी निश्चित केल्या होत्या. त्यानुसार 3.13 मीटर इतकीच भूजल पातळी असल्याने पाणीटंचाईचा प्रश्न जटील बनण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तालुक्यात गतवर्षी 4346 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. समाधानकारक पाऊस पडूनही पाण्याच्या पातळीत घट झाल्याने पाणीटंचाईची चिंता ग्रामस्थांना सतावणार आहे.








