मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा विश्वास : ताज ग्रूपशी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
पणजी : राज्यातील तऊणांसाठी रोजगाराच्या वाढीव संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास संचालनालय आणि ताज ग्रुप यांच्यात बुधवारी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या सहकार्यामुळे भारतातील सर्वात मोठ्या हॉस्पिटॅलिटी स्किलिंग सेंटरचा गोव्यातील मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगितले. शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर, कौशल्य विकास संचालक एस. गावकर आणि ताजचे सीईओ पुनीत छटवाल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा उपक्रम म्हणजे सरकारच्या कौशल्य, पुनर्कौशल्यीकरण आणि कौशल्यविकसन यात तरुण व्यावसायिकांच्या वचनबद्धतेसाठी एक मोठे पाऊल आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले.
राज्यात पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योग सतत विकसित होत आहे. अशावेळी ताज ग्रूपचे कौशल्य आणि उद्योग नेतृत्व गोव्यातील तरुणांना विशेष प्रशिक्षण देऊन सक्षम बनविण्यात, त्यांच्या करिअरच्या संधी वाढविण्यात आणि राज्याच्या आर्थिक वाढीस हातभार लावण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कौशल्य केंद्र प्रशिक्षण कार्यक्रम आणि कार्यशाळांची सर्वसमावेशक श्रेणी ऑफर करेल, जे उद्योगाच्या मागण्या आणि जागतिक आदरातिथ्य मानके पूर्ण करण्यासाठी तयार केले जाईल. त्यांनी सांगितले की त्यांची भागिदारी कुशल कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रमुख जागतिक पर्यटन स्थळ म्हणून आपले स्थान मजबूत करण्याच्या गोव्याच्या वचनबद्धतेची पुष्टी करते, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.









