कोल्हापूर :
क्रिप्टोकरन्सी या ई–कॅश किंवा डिजिटल करन्सीमध्ये कोल्हापूरकरांनी त्या करन्सीच्या आजच्या बाजारभावाने तब्बल साडेसहा हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. वर्षाला 10 टक्क्यांच्या हमीसह किमान तिप्पट रक्कम मिळणारच, या अमिषापोटी कोल्हापूरकर अक्षरश: गंडवले गेले आहेत. आभासी चलनाच्या हवेवर कोल्हापूरकरांनी आर्थिक फायद्याचे इमले बांधले असून अप्रत्यक्षरित्या होणाऱ्या गुंतवणुकीतील फसवणुकीनंतर पोलिसांकडे तक्रारींचे प्रमाण वाढत आहे.
‘सीबीआय’ने देशभरातील 60 ठिकाणांसह कोल्हापुरातील गुंतवणुकीची माहिती घेतल्याने यातील गुंतवणूक पुन्हा ऐरणीवर आली आहे. ‘सीबीआय’च्या छाप्यात देशभरातील साडेसहा हजार कोटींची क्रिप्टोकरन्सीमध्ये फसवणुकीचा प्रकार उघडकीस आल्याने यातील गुंतवणुकीबाबतचे अनेक कंगोरे पुढे येऊ लागले आहेत.
व्हर्च्युअल करन्सीच्या माध्यमातून क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करायला सर्वोच्च न्यायालयाने मार्च 2020 मध्ये परवानगी दिली. तत्पूर्वी एप्रिल 2018 मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने क्रिप्टोकरन्सीच्या ट्रेडिंगवर सरसकट बंदी घातली होती. त्यापूर्वी बँका किंवा कोणत्याही वित्त संस्थांना व्हर्च्युअल करन्सीशी निगडीत कोणतीही सेवा देता येत नव्हती. इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. असोसिएशनच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने क्रिप्टोकरन्सीमधल्या व्यवहारांचा मार्ग खुला केला. मात्र, यातील गुंतवणुकीचे अपुरे ज्ञान, जादा परताव्याला अनेकजण फसले.
गेल्या काही महिन्यांत एका बिटकॉईनची किंमत 30 हजार डॉलरवरुन 60 हजार डॉलरवर गेली. यामध्ये होणारा चढउतार अकारण आणि विस्मयकारक आहे. दरवर्षी बिटकॉईनची किंमती वाढत असल्याने परतावा घेण्यापेक्षा यामध्ये पूर्ण माहिती नसतानाही दुरस्थ यंत्रणेमार्फत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्याही वाढली. हेच येथील फसवणुकीचे मोठे कारण आहे.
आजच्या काळात बहुतेक वस्तू किंवा सेवांच्या खरेदीसाठी याचा वापर करता येत नाही. सरकारने अद्याप क्रिप्टोकरन्सीबाबत कोणतेही नियमन केलेले नाही. क्रिप्टोकरन्सीतील वाढ कागदावर दिसते, मात्र प्रत्यक्ष परतावा मिळत नसल्याचा तक्रारी आहेत.
- चलन काम कसे करते..!
कोणत्याही देशाचे सरकार वा बँक हे चलन ‘छापत’ नाही. क्रिप्टोकरन्सी ही फक्त ऑनलाईन उपलब्ध असते. ब्लॉकचेनमार्फत क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतात. क्रिप्टो करन्सी ऑनलाईन असते, एका कॉम्प्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेली असते. ही खरेदी केल्यावर खरेदीदाराचे वॉलेट तयार होते, ज्यात ही करन्सी साठवली जाते. अशी प्रत्येक क्रिप्टो करन्सी खरेदी केल्यावर एक नवा ब्लॉक तयार होतो आणि या प्रक्रियेला माईनिंग म्हणतात. जितके जास्त आर्थिक व्यवहार एका ब्लॉकचेनमध्ये होतील, तितके अधिक ब्लॉक बनतील आणि तितकी अधिक माईनिंग होईल. शेअर बाजार हे नियामक संस्थांकडून चालवले जातात. म्हणजे व्यवहारांवर नियामक मंडळाचे लक्ष असते. पण या ठिकाणी तसे नाही. या व्यवहारांवर कोणत्याही नियामकाचे वा सरकारचे नियंत्रण अथवा लक्ष नसते. या व्यवहारांसाठी काही नियम नाहीत. म्हणूनच याचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते.
- क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय ?
क्रिप्टो करन्सी हे इंटरनेटवर वापरण्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे तयार केले जाते. रुपया किंवा डॉलरसारख्या पारंपरिक चलनासारखे नोट किंवा नाण्यांमध्ये क्रिप्टोकरन्सी मिळत नाही. ज्याप्रमाणे बँक खात्यात पैसे ठेवतो आणि इंटरनेट बँकिंगद्वारे शिल्लक तपासता. त्याचप्रमाणे क्रिप्टोकरन्सी व्हर्च्युअल वॉलेटमध्ये ठेवले जातात. इंटरनेट वापरून मोबाईल, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरून ते अॅक्सेस करता येतात. याचा पासवर्ड हीच या आभासी पैशाच्या तिजोरीची किल्ली आहे. पासवर्ड विसरला तर त्याची रिकव्हरी जवळपास अशक्य असते. बहुतेक वेळा हा पासवर्ड किंवा की ही दुहेरी पद्धतीने वापरली जाते. ज्याच्याकडे गुंतवणूक केली आहे, त्याचे हातवर केल्यास घातलेला पैसा परत मिळणे केवळ अशक्य आहे.
- ग्राहक आणि यंत्रणाही अनभिन्न
क्रिप्टोकरन्सीत आपली फसवणूक झाली आहे, हे ग्राहकाला खूप उशिरा समजते. आपली रक्कम काही शेकडो पटीत वाढत आहे, यात ग्राहक खूष असतो. मात्र कागदावरील रक्कम प्रत्यक्षात मिळवण्याचे दिव्य आहे. वाढीव रक्कम लांबच, मुद्दलही निघत नसल्याचे लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. अशा फसवणुकीची तक्रार कुठे आणि कशी करायची, याबाबत अज्ञान आहे. कंपन्यांचे सर्व्हरही परदेशात असल्याने यंत्रणेवर जिल्हास्तरावर तपासाच्या मर्यादा असतात.








