परिवहनकडून हालचाली, प्रवाशांना दिलासा
बेळगाव : मागील चार दिवसांपासून ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा गुरुवारपासून पूर्ववतपणे सुरू होणार आहे, अशी माहिती परिवहनने दिली आहे. बुधवारी बेळगाव बसस्थानकातून सीमाहद्दीपर्यंत काही बसेस सोडण्यात आल्या. मात्र गुरुवारपासून महाराष्ट्रात सर्वत्र बससेवा सुरळीतपणे सुरू होणार आहे. यासाठी दोन्ही राज्यांच्या शासकीय पातळीवर आणि परिवहन मंडळांकडून तयारी करण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. चित्रदुर्ग येथे घडलेल्या घटनेमुळे दोन्ही राज्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दोन्ही राज्यांच्या बसेसना स्थानिक कार्यकर्त्यांनी काळे फासले होते. दरम्यान खबरदारी म्हणून दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांनी बससेवा ठप्प केली होती.
दोन्ही राज्यांतील तणाव हळूहळू कमी होत असून बुधवारी मार्गदर्शक तत्त्वावर बेळगाव विभागातून सीमाहद्दीपर्यंत बसेस सोडण्यात आल्या आहेत. तर गुरुवारपासून महाराष्ट्राच्या विविध मार्गांवर कर्नाटकच्या बसेस धावणार आहेत, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. क्षुल्लक कारणावरून दोन राज्यांमध्ये निर्माण झालेल्या वादाचा परिणाम दोन्ही राज्यांतील परिवहन मंडळांवर झाला आहे. विशेषत: बेळगाव विभागाचे दररोज लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र परिवहनलाही मोठा फटका बसला आहे. शिवाय आंतरराज्य प्रवास करणाऱ्या प्रवाशांचेही मोठे हाल झाले आहेत. यात प्रवाशांना मोठा आर्थिक भुर्दंडही बसला आहे. मात्र आता वाद निवळल्याने गुरुवारपासून आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. शिवाय बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकात महाराष्ट्रात बसेस सोडण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली आहे.









