पाच्छापूरनजीक मावनूर रोडवरील घटना
बेळगाव : कौटुंबिक वादातून मद्यपी पतीने पत्नीच्या पाठीत चाकू खुपसल्याची घटना मंगळवार दि. 25 रोजी सायंकाळी पाच्छापूरनजीकच्या मावनूर रोडवर घडली आहे. उद्दव्वा हालाप्पा गुटगुद्दी (वय 24 रा. मावनूर) असे जखमी महिलेचे नाव असून तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी हल्लेखोर पती हालाप्पा (वय 28) याला अटक केली आहे. उद्दव्वा आणि हालाप्पा यांचे चार वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. मात्र हालाप्पाला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो पत्नीला बारीक सारीक कारणावरून त्रास देत होता. त्यामुळे ती गेल्या दोन वर्षांपासून माहेरी राहायला होती. भाजीपाला विक्री करून ती आपला उदरनिर्वाह चालवित होती. मंगळवारी पाच्छापूरच्या बाजाराला जाण्यासाठी ती एका मोटारसायकलवरून जात होती. तिच्या मागून मोटारसायकलवरून आलेल्या पतीने पाठीत चाकू खुपसल्याने ती गंभीर जखमी झाली. त्यानंतर हल्लेखोर पतीने घटनास्थळावरून पलायन केले. जखमी उद्दव्वाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती समजताच यमकनमर्डी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी हल्लेखोर पतीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी अधिक तपास करीत आहेत.









