आयआरएस आकाश चौगुले यांचे प्रतिपादन : म. ए. युवा समितीच्या पुरस्कारांचे वितरण
बेळगाव : ज्या भाषेतून विद्यार्थ्याला ज्ञान अवगत होते, त्या भाषेतूनच त्याला शिक्षण दिले गेले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेला विद्यार्थी जगाच्या पाठीवर कुठेही कमी पडत नाही. त्यामुळे मातृभाषेतून शिक्षण देण्यावर पालकांनी भर द्यावा. जो विद्यार्थी मातृभाषेत उत्तम शिकला, तो इतर भाषाही उत्तमरीत्या शिकू शकतो. भाषेसोबतच स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न करत रहा, असे विचार बेळगावचे जीएसटी अप्पर आयुक्त आयआरएस आकाश चौगुले यांनी मांडले. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भव्य सामान्यज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण, आदर्श शाळा पुरस्कार वितरण व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान असा संयुक्त कार्यक्रम बुधवारी मराठा मंदिरच्या सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात आकाश चौगुले बोलत होते. महाराजांनी केलेले शौर्य हे त्या काळासाठी गरजेचे होते. परंतु, आता छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी त्यांच्या विचारांप्रमाणे राजकीय व प्रशासकीय सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न केला असता.
प्रशासकीय सत्ता मिळवायची असेल तर अधिकाधिक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अधिकारी कसे होतील, याकडे लक्ष पुरवावे लागेल. युवा समितीने सामान्यज्ञान स्पर्धेतून स्पर्धा परीक्षांची सुरुवात केली असून यातून प्रेरणा घेऊन उद्याचा अधिकारी तयार होऊ शकतो, असे गौरवोद्गार चौगुले यांनी काढले. व्यासपीठावर मुरलीधर पाटील, शिवानी पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, जीएसटी अधिकारी बंडा पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, रमाकांत कोंडुसकर, आप्पासाहेब गुरव, मालोजी अष्टेकर, मदन बामणे, पंढरी परब, अॅड. सुधीर चव्हाण, महादेव चौगुले, बी. बी. पाटील, तुकेश पाटील, अमित देसाई, राजू बिर्जे, शिवाजी हावळाण्णाचे, मनोहर हलगेकर, शिवाजी कुडूचकर, रमेश रायजादे यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी गोरल हिने केले. शार्दुल केसरकर या चिमुकल्याने अप्रतिम पोवाडा सादर केला. श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक करून युवा समितीच्या उपक्रमांची माहिती दिली. या कार्यक्रमात आदर्श शाळा पुरस्कार विजेत्या शाळांचे शिक्षक व पालकांनी पुरस्कार स्वीकारला. याबरोबरच स्वयंसेवक म्हणून कार्य केलेल्या तरुणांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित होते.









