अनेक शिवमंदिरांत भजन, कीर्तन, प्रवचनाचे आयोजन : मलप्रभा नदीत भाविकांनी साधली स्नानपर्वणी
खानापूर : खानापूर तालुक्यात महाशिवरात्रीनिमित्त शिवालयांतून शिवनामाचा जय जयकार करत भाविकांनी महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या भक्तिभावाने शिवाचे पूजन केले. तालुक्यातील सर्व शिवालयांतून भाविकांची गर्दी झाली होती. असोगा रामलिंगेश्वर मंदिर परिसरात, मलप्रभा नदीघाट तसेच स्वयंभू हब्बनहट्टी तीर्थक्षेत्रावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली होती. तालुक्यातील नाथपंथीयांच्या डोंगरगाव, किरावळे, बाळेवाडी व हंडीभडंगनाथ मठावर भाविकांनी गर्दी केली होती. तसेच गुरुवार दि. 28 रोजी आमावस्या असल्याने या दिवशीही अनेक ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. सर्वच क्षेत्रावर आमावस्येनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
खानापूर शहरातील मलप्रभा नदीतीरी असलेल्या पंचमुखी महादेव मंदिरात राजाराम जोशी यांच्या हस्ते पहाटे रुद्राभिषेक पूजा करण्यात आली. दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. नदी घाटावर भाविकांनी स्नान आणि पूजेसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. हेस्कॉम येथील महेश्वर महादेव मंदिरात हेस्कॉमचे कर्मचारी धीरज सरदेसाई यांच्या हस्ते अभिषेक आणि पूजा करण्यात आली. तसेच कलमेश्वर मंदिरात अभिषेक व पूजा करण्यात आली.
असोगा येथील रामलिंग मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. पहाटे अभिषेक आणि पूजा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. आणि दिवसभर भाविकानी दर्शनासाठी गर्दी केली होती. रामलिंग देवस्थानात रात्री 9 नंतर अभिषेक करण्यात येतो. पहिला अभिषेक मलप्रभेच्या पात्रातील शिवलिंगावर करण्यात येतो. यानंतर पुजेनिमित्त मंदिरातील शिवलिंगावर रात्रभर वेगवेगळे असे चार अभिषेक करण्यात येतात. पहाटे आरती होऊन पुजेची सांगता करण्यात येते.
कणकुंबी येथील माउली मंदिर, हब्बनहट्टी येथील स्वयंभू हनुमान मंदिर, असोगा येथील रामलिंगेश्वर मंदिर, खानापूर मलप्रभा घाटातील महादेव मंदिर तसेच नाथपंथियांचे मठ असलेले डोंगरगाव, हंडीभडंगनाथ, बाळेवाडी, किरावळे या मठावर महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक विधी करण्यात आले. हंडीभडंगनाथ मठावर शिवरात्रनिमित्त वेशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. डोंगरगाव मठ, किरावळे मठ, बाळेवाडी मठ येथेही भजन, पूजन आणि आमावस्येनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्वच ठिकाणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.









