वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिंपिक विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या नेदरलँड्सला शूटआउटमध्ये पराभूत केले आणि एफआयएच प्रो लीगच्या त्यांच्या घरच्या टप्प्याचा शेवट येथे विजयी पद्धतीने केला.
पिएन सँडर्स (17 व्या मिनिटाला) आणि फे व्हॅन डेर एल्स्ट (28 व्या मिनिटाला) यांनी मध्यांतरापर्यंत नेदरलँड्सला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु भारताने दीपिका (35 व्या मिनिटाला) आणि बलजित कौर (43 व्या मिनिटाला) यांच्या शानदार गोलांद्वारे बरोबरी साधत जोरदार पुनरागमन केले.
शूटआउटमध्ये दीपिका आणि मुमताज खान यांनी भारतासाठी लक्ष्य गाठले, तर मारिजन वीन ही गतविजेत्या नेदरलँड्ससाठी एकमेव गोल करणारी खेळाडू राहिली. भारताची अनुभवी गोलरक्षक सविता पुनियाने चार महत्त्वपूर्ण फटके निष्फळ ठरवून संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. सोमवारी पहिल्या लेगमध्ये भारताला याच प्रतिस्पर्ध्यांकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागला होता.
15 फेब्रुवारीपासून मायदेशात खेळल्या गेलेल्या आठ सामन्यांमध्ये भारताने मंगळवारच्या सामन्यासह तीन जिंकले आणि पाच गमावले. यापैकी एका सामन्यात त्यांना शूटआउटमध्ये पराभूत व्हावे लागले. शूटआउटमधील विजयातून मिळालेल्या बोनस गुणासह भारतीय संघ सध्या प्रो लीग गुणतक्त्यावर 12 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, तर इंग्लंड 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे.
संघाच्या प्रत्येक सदस्याला मिळणार 1 लाख रुपयांचे बक्षीस
दरम्यान, नेदरलँड्सवर शूटआउटमध्ये शानदार विजय मिळविल्याने भारतीय महिला संघाच्या प्रत्येक सदस्याला हॉकी इंडियाकडून (एचआय) रोख बक्षीस म्हणून एक लाख ऊपये मिळतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. तसेच सपोर्ट स्टाफच्या सदस्यांना प्रत्येकी 50 हजार रु. ऊपये मिळतील. प्रत्येक विजयामागे 50 हजार रु. देण्याच्या विद्यमान धोरणाव्यतिरिक्त हे रोख बक्षीस आहे, असे हॉकी इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे.









