2 आठवड्यांमध्ये सुरू होणार गोल्ड कार्ड व्हिसा प्रोग्राम : नव्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांची स्वाक्षरी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे नागरिकत्व देण्याच्या बदल्यात 5 पट अधिक रक्कम वसूल करणार आहेत. ट्रम्प यांनी गोल्ड कार्ड नावाने एक नवा व्हिसा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. 5 दशलक्ष डॉलर्स (44 कोटी रुपये)मध्ये हा व्हिसा खरेदी करता येणार आहे. ट्रम्प यांनी याला अमेरिकेच्या नागरिकत्वाचा मार्ग संबोधिले आहे.
ट्रम्प यांनी गोल्ड कार्डला ईबी-5 व्हिसा कार्यक्रमाचा पर्याय ठरविले आणि भविष्यात 10 लाख गोल्ड कार्ड विकण्यात येणार असल्याचे सांगितले. सध्या अमेरिकन नागरिकत्वासाठी ईबी-5 व्हिसा कार्यक्रम सर्वात सोपा मार्ग आहे. याकरता लोकांना 1 दशलक्ष डॉलर्स (सुमारे 8.75 कोटी रुपये) द्यावे लागतात.
हे व्हिसा कार्ड अमेरिकन नागरिकत्वाचा मार्ग खुला करणार आहे. हा व्हिसा खरेदी करत लोक अमेरिकेतील येतील आणि येथे अधिक कर भरतील. हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरेल आणि यामुळे राष्ट्रीय कर्ज फेडण्यास मदत होणार असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.
ग्रीनकार्डसारखे विशेष अधिकार मिळणार
ट्रम्प यांनी व्हिसा कार्यक्रमाशी निगडित कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी करत गोल्ड व्हिसा नागरिकांना ग्रीनकार्डसारखा विशेषाधिकार देणार असल्याचे म्हटले. हा कार्यक्रम 2 आठवड्यांमध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. नव्या योजनेविषयी विस्तृत माहिती लवकरच समोर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. नव्या व्हिसा कार्यक्रमामुळे देशातील गुंतवणूक वाढेल, याचबरोबर ईबी-5 शी निगडित फसवणूक थांबणार असून नोकरशाहीला आळा बसेल असे उद्गार अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉर्वड लुटनिक यांनी काढले आहेत.
35 वर्षे जुनी व्यवस्था बदलणार
अमेरिकेत स्थायी स्वरुपात वास्तव्यासाठी ग्रीनगार्डची गरज असते. याकरता ईबी-1, ईबी-2, ईबी-3, ईबी-4 व्हिसा कार्यक्रम आहेत, परंतु ईबी-5 व्हिसा कार्यक्रम सर्वात चांगला पर्याय आहे. 1990 पासून हा लागू आहे. यात कुठलाही वयकती रोजगार देणाऱ्या नियुक्तीदाराशी बांधील नसतो आणि अमेरिकेत कुठेही राहून काम किंवा शिक्षण घेऊ शकतो. हा व्हिसा प्राप्त करण्यास 4-6 महिन्यांचा कालावधी लागतो. ईबी-4 व्हिसा कार्यक्रमाचा उद्देश विदेशी गुंतवणूक प्राप्त करणे आहे. यात लोकांना कुठल्याही अशा उद्योगात 1 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करावी लागते, जो कमीतकमी 10 रोजगार निर्माण करतो. हा व्हिसा कार्यक्रम गुंतवणूकदार, त्याची पत्नी किंवा पती आणि 21 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना अमेरिकेचे स्थायी नागरिकत्व मिळवून देतो.
भारतीयांवरील प्रभाव
अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी ईबी-5 कार्यक्रमांवर अवलंबून असलेल्या भारतीयांना आता गोल्ड व्हिसा कार्यक्रम अत्यंत महाग ठरू शकतो. ईबी-5 कार्यक्रम संपुष्टात आणल्यास ग्रीनगार्डच्या दीर्घ बॅकलॉगमध्ये अडकलेल्या कुशल भारतीय तंत्रज्ञांनाही नुकसान होऊ शकते. भारतीय अर्जदारांना पूर्वीच रोजगार आधारित ग्रीनकार्ड श्रेणीच्या अंतर्गत दशकांपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. गोल्ड कार्डच्या प्रारंभासोबत इमिग्रेशन सिस्टीम अधिक शुल्क न भरू शकणाऱ्या लोकांसाठी आव्हानात्मक ठरू शकते.









