विदेशमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन : आमचे मॉडेल शोषणावर आधारित नाही
वृत्तसंस्था/ टोकियो
विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी टोकियो येथे जपान-भारत-आफ्रिका बिझनेस फोरमला बुधवारी संबोधित केले. भारत आणि जपान स्वत:च्या वैशिष्ट्यांना एकत्र आणत आफ्रिकेच्या विकासात शाश्वत आणि समावेशक योगदान देऊ शकतात. भारताची आफ्रिकेबद्दलची भूमिका नेहमीच दीर्घकालीन आणि लाभदायक भागीदारीवर आधारित राहिली आहे. ही भागीदारी केवळ साधनसंपदा मिळविण्यावर आधारित नव्हती असे उद्गार त्यांनी काढले आहेत. चीन आफ्रिकेत स्वत:चा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करत असताना जयशंकर यांनी ही भूमिका मांडली आहे.
भारताचे लक्ष क्षमतावृद्धी, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणावर आहे, जेणेकरून आफ्रिकेतील देश आत्मनिर्भर होऊ शकतील. भारत आफ्रिकेचा चौथा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापार 100 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असल्याचे जयशंकर म्हणाले.
200 हून अधिक प्रकल्पांची पूर्तता
भारताने आफ्रिकेत संपर्कव्यवस्था आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 12 अब्ज डॉलर्सचे सवलतीच्या दरातील सहाय्य केले आहे. भारताने तेथे 200 हून अधिक प्रकल्प पूर्ण केले असून यात रेल्वे, वीज निर्मिती, कृषी आणि जलपुरवठा सामील आहे. भारताकडून करण्यात आलेल्या विकासकामांमुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळाला आणि त्यांचे जीवन सुधाले. भारत आफ्रिका आणि अन्य देशांसाठी एक महत्त्वपूर्ण औद्योगिक केंद्र ठरू शकतो, तर तेथे जपानच्या कंपन्या गुंतवणूक करू शकतात असे विदेशमंत्री म्हणाले.
आत्मनिर्भर पुरवठा साखळी
भारत आणि जपान मिळून आफ्रिकेत मजबूत तसेच आत्मनिर्भर पुरवठा साखळी निर्माण करू शकतात. यामुळे तेथील विकासाला चालना मिळू शकते. आफ्रिकेची प्रगती केवळ तेथील लोकांसाठी उपयुक्त ठरणार नसून जागतिक स्थिरता आणि आर्थिक विकासातही योगदान देणार असल्याचा दावा जयशंकर यांनी केला आहे.









