चारवेळा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर जिंकून खासदार झालेले वरिष्ठ नेते शशी थरुर यांच्या केंद्राच्या कौतुकस्तुतीपर वक्तव्याने सध्याला नव्या वादळाला तोंड फुटले आहे. खासदार शशी थरुर यांनी केंद्र सरकारच्या कार्याची प्रशंसा केली असून सोबत त्यांनी सत्ताधारी पक्षातील केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत सेल्फी फोटोही शेअर केल्याने याबाबत राजकीय गोटात व सर्वसामान्यांमध्ये चर्चा झडली नसती तरच नवल होते.
येणाऱ्या काळात बिहारमध्ये आणि नंतर तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर थरुर यांनी केंद्र सरकारच्या कार्यावरच थेटपणे कौतुकाचा वर्षाव केल्याने ते सध्याला त्यांच्या पक्षाकडून अर्थात काँग्रेसकडून कॉर्नर झाले आहेत. केंद्राने ब्रिटनसोबत व्यापार कराराच्या चर्चेचेही त्यांनी कौतुक केले आहे. वाणिज्य मंत्री गोयल व ब्रिटनचे व्यापार मंत्री जोनाथन रिनोल्डस यांच्यातील झालेल्या कराराबाबतच्या चर्चेबद्दल थरुर यांनी केलेले कौतुक आता केरळातच काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणात वादळ उठवणारे ठरले आहे. यासाऱ्याबाबत केरळमधील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. भाजपशी होणारी जवळीक काँग्रेसला चिंतेची वाटू लागली असून थरुर यांच्या भविष्यकालीन वाटचालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना असल्याचे बोलले जात आहे. पण दुसरीकडे थरुर यांनी केरळमधील सरकारच्या कामाचे कौतुकही केले होते. उदार आर्थिक धोरण व व्यवसायानुकूल वातावरण तयार करण्याबाबतच्या कार्याचीही त्यांनी प्रशंसा केली होती. यासोबत पंतप्रधान मोदी व अमेरिका अध्यक्ष ट्रम्प यांच्या भेटीची, चर्चेची प्रशंसा थरुर यांनी केली होती. एकंदर या घटना पाहता वरिष्ठ नेते शशी थरुर हे त्यांच्याच पक्षात नाराज आहेत का, त्यांना साईडलाइन केले जाते आहे का, त्यांचा पक्षासाठी आता उपयोग नाही, अशी विचारधारा स्पष्ट झाली आहे का, हे सारे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या टीकेनंतर शशी थरुर यांनी काँग्रेसला माझा उपयोग नसेल तर मी अन्य मार्गावर जायला तयार असल्याचे संकेतच त्यांनी बोलून दाखवले आहेत. आता या त्यांच्या विधानानेही नव्या तर्कवितर्कांना पुढे आणले आहे. थरुर यांनी मी माझी स्वत:ची मते मांडलेली असून माझा उपयोग करायचा की नाही हे काँग्रेस नेतृत्वानेच ठरवावे असे सांगून कुठे तरी पाणी मुरतंय या शंकेला जागं केलं आहे.
केरळातील वरिष्ठ काँग्रेस नेत्यांनी सध्या तरी थरुर यांच्या वक्तव्यावर जास्त भाष्य न करण्याचेच ठरवले असल्याचे समजते. येणाऱ्या काळात केरळात विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे, अशावेळी त्यांनी केलेली विधाने ही स्वपक्षाला आत्मचिंतन करायला लावणारी सध्यातरी वाटत आहेत. एवढंच नाही त्यांनी केरळमधील सत्ताधारी कम्युनिष्ट पक्षाच्या कामाचेही कौतुक केले आहे. यावर सफाई देताना त्यांनी आपण केरळच्या आर्थिक विकासावर बोललो आहे. त्याचा वेगळा राजकीय अर्थ काढण्यात येत आहे. ताज्या घडामोडीत शशी थरुर हे काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांना भेटले असल्याचे समजते. पण त्यात नेमके काय घडले हे समजू शकलेले नाही. काँग्रेसप्रणीत वीकष्णम डेली यात थरुर यांच्या वक्तव्यावर थेटपणे टीका करण्यात आलीय. त्यांनी आपल्या संपादकीयात थरुर यांना सावध होण्याचे आवाहन केले आहे. अशा वक्तव्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांवर परिणाम होऊ शकतो, असाही गर्भित इशारा देण्यात आल्याचे समजते. एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी यावर आता पडदा पडल्याचे जाहीर केले आहे. ही वादळापूर्वीची शांतता आहे की अन्य काही हे लवकरच समजू शकणार आहे. बिहारसह दक्षिणेतल्या राज्यात येत्या काळात निवडणुका होत आहेत, त्यापूर्वी थरुर यांनी ज्याप्रकारे वक्तव्ये केली त्यावरुन उलटसुलट चर्चांना उधाण मात्र आले आहे. येणाऱ्या दिवसात नवे काही घडणार आहे का हे लवकरच समजून येणार आहे.
-दीपक कश्यप








