आंतरराज्य बससेवा सुरळीत करण्यासाठी हालचाली
बेळगाव : चित्रदुर्ग येथील घटनेमुळे मागील चार दिवसांपासून ठप्प झालेली आंतरराज्य बससेवा सुरू करण्यासाठी दोन्ही राज्यातील परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली आहे. सीमाभागातील प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आंतरराज्य बससेवा सुरळीत सुरू करावी, अशी मागणीही सर्वसामान्य प्रवाशांतून होत आहे. सुळेभावी बसमध्ये प्रवासी आणि बसवाहकाच्या वादावादीनंतर चित्रदुर्ग येथे करवेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र एसटीला काळे फासले आणि त्यानंतर हा वाद अधिक चिघळला होता. शिवाय क्षुल्लक वादावादीच्या कारणाला भाषिक तेढ निर्माण करण्याचे काम करवेकडून केले जात आहे. मात्र हा वाद संपवून बससेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी दोन्ही राज्याच्या प्रशासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या बसेस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातील लालपरी कर्नाटकात धावणार आहेत.
मागील चार दिवसांपासून आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याने दोन्ही राज्याच्या परिवहनचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. विशेषत: बेळगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील परिवहनला मोठा फटका बसला आहे. बेळगाव व कोल्हापूर आगारातून आंतरराज्य प्रवासासाठी धावणाऱ्या बसेसची संख्या मोठी आहे. शिवाय दोन्ही जिल्हे सीमेवर आहेत. त्यामुळे या दोन्ही आगारांचे नुकसान होऊ लागले आहे. यावर तोडगा काढून आंतरराज्य बससेवा सुरळीत आणि पूर्ववत करणे आवश्यक आहे. आंतरराज्य बससेवा सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू असल्या तरी दुसरीकडे मात्र करवेचे कार्यकर्ते विविध ठिकाणी आंदोलन करून विषय वाढविण्याच्या प्रयत्नात आहेत. क्षुल्लक कारणावरून निर्माण झालेला वाद दोन्ही राज्यांच्या बससेवा ठप्प होतील इथपर्यंत पोहोचला आहे. या सर्व प्रकारामुळे सर्वसामान्यांची मात्र फरफट होऊ लागली आहे.
आंतरराज्य बससेवा ठप्प झाल्याने सीमावर्ती भागात लोकल प्रवास वडापने करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांची आर्थिक लूट होऊ लागली आहे. निपाणी, शिनोळी, कोवाड आदी भागांमध्ये प्रवाशांना खासगी वाहनांनीच ये-जा करावी लागत आहे. चंदगड आणि कोकणातून येणाऱ्या महाराष्ट्राच्या बसेस शिनोळी येथून माघारी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना शिनोळी येथून पुन्हा खासगी वाहनाने बेळगाव गाठावे लागत आहे. यामध्ये प्रवाशांचा वेळ वाया आणि आर्थिक फटकाही बसू लागला आहे.









