तीन तास हायड्रामा : सामान्य जनतेला नाहक त्रास : कन्नड संघटनांतील वर्चस्व वादातून दोन वेगवेगळी आंदोलने
बेळगाव : बाळेकुंद्री येथे बस कंडक्टर आणि प्रवाशात झालेल्या वादाचे खापर म. ए. समितीवर फोडत कन्नड संघटनांनी मंगळवारी चन्नम्मा चौकात अक्षरश: हैदोस घातला. कन्नड संघटनांतील वर्चस्व वादातून दोन वेगवेगळी आंदोलने करून दुपारी 12 ते 2.30 पर्यंत चन्नम्मा चौकात हायड्रामा करण्यात आला. पोलिसांनी खबरदारी घेत चन्नम्मा चौकाकडे येणारे सर्व रस्ते बॅरिकेड्स लावून बंद केले. आंदोलन करणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले तर दुसऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्टंटबाजी करत काढता पाय घेतला.
बस तिकिटाच्या वादातून कंडक्टर आणि विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाला भाषिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे मारहाण करणाऱ्याला अटक करण्याची मागणी करण्यासह सर्व खापर म. ए. समितीवर फोडले जात आहे. यापूर्वीच विविध कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाच्या नावाखाली शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला आहे. इतकेच नव्हे तर चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातून चित्रदुर्गला आलेल्या बसचालक आणि कंडक्टरला काळे फासून धक्काबुक्की करण्यात आली होती. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत.
म. ए. समिती नेत्यांना तडीपार करण्यात यावे, गुंडा कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी हास्यास्पद मागणी करत एकाच नावाखाली कार्यरत असलेल्या दोन कानडी संघटनांनी मंगळवारी चन्नम्मा चौकात धुडगूस घातला. पोलिसांकडून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन करून हायड्रामा करणाऱ्या एका संघटनेच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेत बसमध्ये कोंबले. तर दुसरा गट काहीवेळानंतर क्लब रोडवरून चन्नम्मा चौकात दाखल झाला. त्यावेळी त्यांच्या म्होरक्याने मूठभर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत म. ए. समिती विरोधात गरळ ओकली. दुपारी 12 ते 2.30 पर्यंत हायड्रामा सुरूच होता. पोलिसांनी वाहतूक अन्य मार्गावरून वळवली. अचानक वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला. एकंदरीत आंदोलनाच्या नावाखाली जवळपास 3 तास बेळगावकरांना वेठीस धरण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.









