जानेवारीत 27,400 प्रवाशांचा हवाई प्रवास
बेळगाव : बेळगाव विमानतळावरून जानेवारी महिन्यात 27,435 प्रवाशांनी विमान प्रवास केला आहे. या महिन्यात 402 विमानांची ये-जा होती. तर 1.7 मेट्रिक टन कार्गोची वाहतूक करण्यात आल्याची नोंद विमानतळ प्राधिकरणाकडे आहे. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत दोन हजारांनी प्रवासी संख्या घटली असली तरी विमानफेऱ्या रद्द होत असतानाही प्रवासी संख्या उत्तम आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून नुकतीच जानेवारी महिन्याची प्रवासी संख्या जाहीर करण्यात आली. डिसेंबर 2024 मध्ये 29,080 प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. या महिन्यात कर्नाटक विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन, त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रीय अधिवेशन बेळगावमध्ये झाल्याने विमानफेऱ्या, तसेच प्रवाशांची संख्या वाढली होती. त्यामुळे डिसेंबर महिन्यातील प्रवासी संख्येच्या तुलनेत जानेवारीमध्ये प्रवासी संख्या कमी झाली. सध्या बेळगाव विमानतळावरून बेंगळूर, दिल्ली, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, नागपूर, जयपूर व तिरुपती या शहरांना विमानसेवा दिली जात आहे. विमानाने होणाऱ्या मालवाहतुकीतही वाढ असल्याने केंद्र सरकारने कार्गो सेवेसाठी भर देण्याची मागणी प्रवासीवर्गातून होत आहे.









