मराठी भाषिकांवर होणाऱ्या अन्यायाची दिली माहिती
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवानेते शुभम शेळके यांनी मंगळवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई येथे भेट घेतली. करवेच्या दबावाखाली येत पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना देण्यात आली. याबाबत आपण कर्नाटक सरकारशी बोलू, असे आश्वासन त्यांनी शुभम शेळके यांना दिले. बाळेकुंद्री येथे झालेल्या वादावादीनंतर भाषिक रंग देऊन प्रकरण चिघळण्याचा प्रयत्न कानडी संघटनांकडून करण्यात येत असल्याने शुभम शेळके यांनी आवाज उठविला होता. परंतु पोलिसांकडून त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्यात आला. करवेचा म्होरक्या बेंगळूरहून बेळगावला येऊन येथील स्थानिक मराठी भूमीपुत्रांना, तसेच म. ए. समितीला पाठबळ देणाऱ्या महाराष्ट्रातील पक्ष-संघटनांना आव्हान देण्याचे काम करीत असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले. याप्रकरणी आपण कर्नाटक सरकारसोबत चर्चा करू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. याचसोबत इतर विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी म. ए. समितीचे सदस्य उपस्थित होते.
वेळ पडल्यास बेळगावात येऊ
मराठी भाषिकांवर होणारा अन्याय वेळीच थांबला नाही तर शिवसेनेला बेळगावमध्ये यावे लागेल. वेळ भासल्यास विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व मी स्वत: बेळगावमध्ये येऊन उत्तर देईन, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. शिवसेना सुरुवातीपासून सीमावासियांच्या पाठीशी असून वेळ भासल्यास रस्त्यावर उतरण्यास शिवसेना मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.









