कोल्हापूर :
जिल्हा परिषदेचे बनावट शिक्के, आणी धनादेश तयार करुन जिल्हापरिषदेची 57 कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जिल्हापरीषद कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार टळला. 57 कोटी रुपयांपैकी 18 कोटी रुपये एका बँक खात्यावर वर्ग झाले आहेत, मात्र कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे हे पैसे फ्रिझ करण्यात यश आले आहे. याबाबतची फिर्याद वित्त विभागाचे लेखाधीकारी कृष्णात लक्ष्मण पाटील (वय 52 रा. नेर्ली ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.
जिल्हा परिषदेचे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये खाते आहे. या खात्यावर राज्यशासनाचे विविध अनुदान, विविध योजनांच्या रक्कम जमा होत असतात. या खात्यावर 19 कोटीचे दोन तर 18 कोटी रुपयांचा एक असे तीन धनादेश पैसे काढण्यासाठी मुंबईतून जमा केले. यामध्ये फोकस इंटरनॅशनल व जिसीएसएसपी प्रायव्हेट लिमीटेड या कंपन्यांचे 19 कोटी रुपयांचे तर ट्रिनीटी इंटरनॅशनल कंपनीचा 18 कोटी रुपयांचा धनादेश मुंबई येथील सानपाडा येथून जमा करण्यात आला होता. यापैकी ट्रिनीटी इंटरनॅशनल कंपनीचा 18 कोटी 40 लाख रुपयांची रक्कम आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली. याचदरम्यान इतकी मोठी रक्कम खात्यावर गेल्याची माहिती जिल्हापरिषदेचे लेखाधीकारी कृष्णात पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची खातरजमा करण्यासाठी जिल्हापरीषदेचे कर्मचारी विशाल चौगुले, सुफियान जमादार यांना बँकेत पाठवले. या दोघांनी जिल्हापरीषदेच्या खात्याचे स्टेटमेंट काढल्यानंतर 18 कोटी 4 लाख रुपयांची रक्कम वर्ग झाल्याची माहिती समोर आली. यानंतर सदरचे पैसे ज्या खात्यावर जमा झाले होते, त्या बँकेशी पत्रव्यवहार करुन ही रक्कम फ्रिज करण्यात आली. अशाच प्रकारे अजून दोन धनादेश आयडीएसी बँक, तसेच कोटक महिंद्रा बँकेतून जिल्हापरिषदेच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेतील खात्यावर आल्याची माहितीही समोर आली. यानंतर जिल्हापरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ या दोनही धनादेशाचे पेमेंट स्टॉप करण्याच्या सुचना बँकेस दिल्या. यानुसार बँकेने या दोनही धनादेशाचे पेमेंट स्टॉप केले. दरम्यान जिल्हापरिषदेच्या फसवणूक होत असल्याचा प्रकार समोर आल्याने लेखाधीकारी कृष्णात लक्ष्मण पाटील (वय 52 रा. नेर्ली ता. करवीर) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार करत आहेत.
जिल्हा परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात आलेले तीनही चेक मुंबई येथील सानपाडा येथून जमा करण्यात आले होते. आयडीएफसी फस्टॅ बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँकेच्या सानपाडा शाखेतून हे चेक जमा करण्यात आले आहेत. दरम्यान या बॅकेतील सिसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी शाहूपुरी पोलिसांचे एक पथक मुंबईला जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
- धनादेश, शिक्का बनावट
हे धनादेश तयार करणारा जिल्हापरिषदेतील माहितगार असल्याची माहिती समोर येत आहे. कारण जिल्हापरिषदेकडे असणारे केडीसी बँकेचे सध्याचे चेकबुक आणि त्यातील चेकवर असणारे नंबर हुबेहुब पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. तर वित्त लेखापालांचा शिक्काही हुबेहुब पद्धतीने तयार करण्यात आला आहे. वित्तलेखापालांची सही देखील बनावट करण्यात आली आहे.








