विविध कार्यक्रमांची रेलचेल : मंदिरांना विद्युत रोषणाई
बेळगाव : शहर परिसरात बुधवारी महाशिवरात्रीनिमित्त शिवालये ‘बम बम भोले’ आणि ‘हर हर महादेव’च्या नामघोषाने दुमदुमणार आहेत. या निमित्ताने मंदिरांतून विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. विशेषत: रुद्राभिषेक, अभिषेक, पूजा-अर्चा, शिवनामस्मरण, शिवभजन, पारायण, जागर, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन केले आहे. शहरातील कपिलेश्वर मंदिर, मिलीटरी महादेव मंदिर, शहापूर मुक्तीधाम, जुने बेळगाव कलमेश्वर मंदिर, शनिवार खूट महादेव आर्केड, गोवावेस पंचवटी रिक्षा स्टँड, खासबाग उप्पार गल्ली, शहापूर खडेबाजार, आनंदनगर, विजयनगर, शाहूनगर, गणेशपूर, हिंडलगा, काकती, कणबर्गी येथील सिद्धेश्वर मंदिरांमध्ये भक्तांची गर्दी पाहावयास मिळणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त बुधवारी शिवालये दर्शनासाठी भक्तांनी फुलणार आहेत. विशेषत: सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरांतून स्वच्छतेबरोबर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सकाळी धार्मिक कार्यक्रमानंतर दुपारी काही मंदिरांमध्ये महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
विजयनगर, शिवगिरी कॉलनी – शिवमंदिर
विजयनगर पाईपलाईन रोड शिवगिरी कॉलनी येथे शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. बुधवारी पहाटे महारुद्राभिषेक व रात्री नामस्मरण, भजन आणि पूजा होणार आहे. शिवभक्तांनी उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक पी. सी. कोकितकर यांनी केले आहे.









