कोल्हापूर :
इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी प्रशांत कोरटकर नावाच्या व्यक्तीविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. तसेच या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस ठाण्याच्यामदतीने सुरु असल्याचेही झाडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंत यांच्या मोबाईलवर मंगळवारी मध्यरात्री एक फोन आला. त्यावरून बोलण्राया व्यक्तीने ‘तुम्ही जो संदर्भ छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत देत आहात ते चुकीचे आहेत, ब्राह्मणांबद्दल वक्तव्य करू नका‘ असे धमकावत शिवागीळ केली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह विधाने केली. इन्टाग्रामवरील अकाऊंटवरूनही सावंत यांच्याबद्दल बदनामीचा मॅसेज प्रसारीत करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. सावंत यांना धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेऊन चौकशीचे आदेश पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांना दुरध्वनीवरुन दिले. यानंतर तात्काळ पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी इंद्रजित सावंत यांची फिर्याद घेवून गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या. यानुसार जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीवकुमार झाडे यांनी इंद्रजित सावंत यांची फिर्याद घेवून फोनवरून कोरटकर असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला.
- कॉल रेकॉर्डिंग मॉर्फ : प्रशांत कोरटकर
या संपूर्ण प्रकरणानंतर प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना आपण कॉल केला नाही. या घटनेशी माझा काहीही संबंध नाही. सध्याचे कॉल रेकॉर्डिंग हे मॉर्फ कऊन व्हायरल करण्यात आले आहे, असे स्पष्टीकरण प्रशांत कोरटकर यांनी दिले आहे.







