चेंबर ऑफ कॉमर्सची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : हिडकल जलाशयातील पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याच्या सरकारच्या निर्णयाला बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजने विरोध दर्शविला आहे. जे पाणी धारवाड औद्योगिक क्षेत्राला पुरविण्याचे नियोजन केले आहे. ते पिण्याचे पाणी असल्याने कोणत्याही औद्योगिक क्षेत्राला पुरविण्यास विरोध राहील, त्यामुळे हा निर्णय तात्काळ बदलावा, अशी मागणी बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्यावतीने जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन हिडकल जलाशयातील पाणी पुरवठ्याबाबत चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात बेळगाव शहर व जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई निर्माण होते. त्यावेळी पाण्यासाठी नागरिकांची वणवण होते. बेळगावच्या औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केला जातो, अशी चुकीची माहिती देण्यात आली आहे. एसटीपी योजनेतून औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत होती. परंतु अद्याप अशा प्रकारे कोणताही पाणीपुरवठा झालेला नाही.
एसटीपी प्रकल्प लवकर पूर्ण करून ते पाणी औद्योगिक वसाहतींना द्या
औद्योगिक क्षेत्रातील पाणीपुरवठा करण्यासाठी एसटीपी पाण्याचा पर्याय आहे. त्यामुळे बेळगावमधील प्रलंबित असलेला एसटीपी प्रकल्प लवकर पूर्ण करून ते पाणी औद्योगिक वसाहतींना द्यावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी अध्यक्ष संजीव कट्टीशेट्टी, उपाध्यक्ष प्रभाकर नागरमुनोळी, स्वप्नील शहा, आनंद देसाई, संजय पोतदार यासह इतर उपस्थित होते.









