विद्यार्थी नेत्याचा कॅबिनेट सदस्यत्वाचा राजीनामा
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशात मागील वर्षी तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांच्या विरोधात झालेल्या विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नाहिद इस्लामनी मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारमधील पदाचा राजीनामा दिला आहे. इस्लाम हे युनूस कॅबिनेटमध्ये माहिती सल्लागार पदावर तैनात होते. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या प्रमुखाला मंगळवारी त्यांनी स्वत:चा राजीनामा सोपविला आहे. नाहिद इस्लाम आता एका नव्या राजकीय पक्षाची स्थापना करणार आहेत.
नाहिद हे युनूस सरकारच्या कामकाजावर नाराज असल्याचे समजते. मागील वर्षी शेख हसीना यांच्या सरकारच्या विरोधातील विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व नाहिद यांच्याकडेच होते. कॅबिनेट आणि अन्य सर्व समित्यांच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे नाहिदने सांगितले आहे.
शुक्रवारी स्थापन करण्यात येणाऱ्या नव्या राजकीय पक्षाच्या संयोजक पदाची जबाबदारी नाहिद सांभाळणार असल्याचे मानले जात आहे. भेदभाव विरोधी आंदोलन आणि राष्ट्रीय नागरिक समितीच्या पुढाकारानुसार नवा राजकीय पक्ष स्थापन केला जाणार आहे. नाहिद यांनी रविवारी मोहम्मद युनूस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती.
नाहिद इस्लाम यांचा राजीनामा अन् आंदोलक विद्यार्थ्यांकडून नव्या पक्षाच्या स्थापनेमुळे बांगलादेशात लवकरच निवडणूक होण्याची शक्यता बळावली आहे. तसेच या विद्यार्थी नेत्यांनी युनूस सरकारवरील दबाव वाढविला आहे. परंतु 2025 च्या अखेरपर्यंत निवडणूक होऊ शकते असे युनूस यांनी म्हटले आहे.









