1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणी शिक्षा, दिल्लीतील न्यायालयाने दिला निर्णय
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी खासदार सज्जनकुमार यांना दिल्लीतील न्यायालयाने 1984 च्या शीखविरोधी दंगल प्रकरणी आजन्म कारावासाची (जन्मठेप) शिक्षा दिली आहे. कुमार यांच्या शीख व्यक्ती आणि त्याच्या पुत्राच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचा, आरोप होता. दंगलींच्या नंतर तब्बल 40 वर्षांनी हा निर्णय देण्यात आला आहे.
तथापि, या शिक्षेवर शीख नेत्यांनी असमाधान व्यक्त केले आहे. आम्ही ही शिक्षा स्वीकारणार नाही. सज्जनकुमार यांना मृत्यूदंडाची शिक्षाच द्यावयास हवी होती. सरकारी वकिलांनीही हीच मागणी केली होती. या शिक्षेपेक्षा खालची कोणतीही शिक्षा शीख समाज स्वीकारणार नाही, असे या समाजाचे दिल्लीतील नेते गुरुलद सिंग यांनी पत्रकारांसमोर स्पष्ट केले. त्यामुळे या शिक्षेविरोधात सरकार आणि शीख समाज उच्च न्यायालयात अपील करण्याची शक्यता आहे.
तिहार कारागृहात वास्तव्य
सज्जनकुमार यांचे वास्तव्य सध्या तिहार कारागृहात आहे. सज्जनकुमार यांच्यावर दंगेखोर आणि हिंसाचारी जमावाचे नेतृत्व करत शीख समुदायाच्या लोकांची घरे जाळणे आणि त्यांच्या हत्या करण्याचा आरोप होता. जसवंतसिंग नामक व्यक्तीच्या घरावर हल्ला करुन त्याला आणि त्याच्या पुत्राला ठार केल्याचे हे प्रकरण आहे. या शीख व्यक्तीच्या पत्नीने यासंबंधीची तक्रार नोंदविली होती. मागच्या आठवड्यात न्यायालयाने सज्जनकुमार यांना दोषी घोषित केले होते. त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. मात्र, न्यायाधीशांनी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा योग्य असल्याचे स्पष्ट केले.
न्या. बवेजा यांचा निर्णय
दिल्ली सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बवेजा यांनी या प्रकरणी 139 पृष्ठांचे निर्णय दिले आहे. कुमार हे बेकायदा जमलेल्या हिंसक जमावाचे नेतृत्व करीत होते. या जमावाने त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात जसवंत आणि तरुणदीप सिंग यांच्यावर क्रूर हल्ला केला आणि त्या दोघांनाही अत्यंत निर्घृणपणे ठार मारले. जसवंत सिंग यांची पत्नी, कन्या आणि पुतणी यांच्यावरही जमावाने हल्ला केला. जसवंत आणि त्यांचे पुत्र तरुणदीप सिंग हे आपल्या या नातेवाईक महिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यात या दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नोव्हेंबर 1984 मधील आहे.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतरच्या दंगली
दिवंगत नेत्या इंदिरा गांधी यांची हत्या 1984 मध्ये त्यांच्या शीख अंगरक्षकांकडून करण्यात आली होती. त्यानंतर शीख समाजाविरोधात दिल्लीत आणि भारतात इतरत्र काही स्थानी प्रचंड दंगली उसळल्या. दिल्लीतील दंगलींमध्ये सज्जनकुमार, जगदीश टायटलर, हरकिशनलाल भगत, ललित माकन इत्यादी काँग्रेस नेत्यांचा सहभाग होता, असा आरोप करण्यात आला होता. त्या दंगलीत एकट्या दिल्लीत 2 हजारांहून अधिक शीखांच्या हत्या करण्यात आल्या होत्या. तसेच असंख्य शिखांची घरे जाळण्यात आली होती. त्यांची शेकडो कोटी रुपयांच्या मालमत्तेची राखरांगोळी करण्यात आली होती. तेव्हापासून अनेक काँग्रेस नेत्यांवर न्यायालयात प्रकरणे सुरु होती. मध्यंतरीच्या काळात शीख दहशतवाद्यांनी ललित माकन यांची हत्या केली होती. तर हरकिशनलाल भगत यांचा नैसर्गिक मृत्यू झाला होता. या दंगलींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन सरकारांनी मारवा आयोग, मिश्रा आयोग, कपूर-मित्तल समिती, जैन-बॅनर्जी समिती, पोट्टी रोषा समिती, जैन-अग्रवाल समिती, अहूजा समिती, धिल्लाँ समिती, नरुला समिती, नानावटी आयोग अशा अनेक संस्था वेळोवेळी स्थापन करण्यात आल्या होत्या. अमेरिका आणि कॅनडामध्येही या दगलीसंबंधी चौकशी झाली होती.
सज्जनकुमार यांची दुसरी शिक्षा
2018 मध्येही शीख दंगलींसंबंधीच्या अन्य एका प्रकरणात सज्जनकुमार यांना आजन्म कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. त्यामुळे ही त्यांची दुसरी शिक्षा आहे. तसेच 2023 मध्ये या दंगलींशी संबंधित अन्य एका प्रकरणात सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तताही करण्यात आली होती. शीख दंगल प्रकरणात शिक्षा ठोठावण्यात आलेले ते पहिलेच काँग्रेस नेते ठरले आहेत, असे दिसून येते.
हिंसाग्रस्तांना न्याय
ड सज्जनकुमार यांना शिक्षा झाल्याने काही हिंसाग्रस्तांना मिळाला न्याय
ड शीख नेते आणि केंद्र सरकारकडून अपील केले जाण्याची दाट शक्यता
ड काँग्रेसकडून अद्याप सज्जनकुमार यांच्या शिक्षेवर व्यक्त नाही प्रतिक्रिया
ड 1984 च्या दंगलींनंतर तब्बल चाळीस वर्षांनी या प्रकरणाचा निर्णय









