वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केरळमधून काँग्रेसचे चार वेळा खासदार झालेले नेते शशी थरुर यांनी केंद्र सरकारच्या कार्याची प्रशंसा केली आहे. तसेच त्यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्यासह काढलेली सेल्फीही प्रसिद्ध केल्याने ते आगामी काळात काय करणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चा केली जात आहे. केंद्र सरकारने ब्रिटनशी व्यापारी करार केल्याने थरुर यांनी केंद्र सरकारची प्रशंसा केली आहे.
केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी ब्रिटनचे व्यापार मंत्री जोनाथन रिनोल्डस् यांच्याशी चर्चा आणि करार केल्याने मला समाधान आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यात मुक्त व्यापार करार होण्याची शक्यता आता वाढली असून तशा कराराची मागणी बऱ्याच काळापासून होती, असा संदेश त्यांनी पोस्ट केला आहे. त्यांनी पियुष गोयल यांची भेट घेऊन सेल्फीही प्रसिद्ध केली आहे.
काँग्रेस नेतृत्व नाराज
थरुर यांच्या भारतीय जनता पक्षाशी होत असलेल्या जवळीकीमुळे काँग्रेस नेतृत्व नाराज झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी थरुर यांनी केरळमधील पिनराई विजयन यांच्या सरकारचेही, त्याच्या उदार आर्थिक धोरणासंबंधी आणि व्यवसायानुकूल वातावरण निर्मिती करण्याच्या प्रयत्नांसंबंधी कौतुक केले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी केलेल्या चर्चेचीची त्यांनी प्रशंसा केली होती. त्यामुळे काँग्रेस नेतृत्व भडकले आहे.
काँग्रेसनेच ठरवावे…
माझ्या काँग्रेसला उपयोग नसेल तर मी अन्य मार्ग चोखाळू शकतो, असे सूचक विधानही त्यांनी केले आहे. त्यामुळे माझा उपयोग कसा करुन घ्यायचा हे काँग्रेसनेच ठरवावे. मला माझी स्वत:ची मते आहेत. त्यामुळे पुढे काय होईल, असे आताच सांगता येणार नाही, असेही मतप्रदर्शन त्यांनी नुकतेच केले आहे.









