दक्षता विभागाकडून कारवाई
वृत्तसंस्था/ चेन्नई
दक्षता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक संचालनालयाने (डीव्हीसी) मंगळवारी तामिळनाडूतील विरोधी पक्ष अण्णाद्रमुकचे कोइम्बतूर उत्तरचे आमदार अम्मान के. अर्जुनन यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. मागील कार्यकाळादरम्यान उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांपेक्षा अधिक संपत्ती जमविल्याचा आरोप अर्जुनन यांच्यावर आहे.
8 डीव्हीसी अधिकाऱ्यांच्या एका पथकाने सशस्त्र पोलिसांसोबत अर्जुनन यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत. 2021 मध्ये द्रमुक सत्तेवर आल्यापासून पहिल्यांदाच डीव्हीसीने अण्णाद्रमुकच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई केली आहे. यापूर्वी भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर आणि माजी स्थानिक प्रशासन मंत्री एस.पी. वेलुमणि यांच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले होते. वेलुमणि हे सध्या अण्णाद्रमुकचे संघटन सचिव आहेत. विजयभास्कर आणि त्यांच्या पत्नीने 35.79 कोटी रुपयांची संपत्ती भ्रष्टाचाराद्वारे मिळविली असल्याचा आरोप आहे. याचबरोबर अण्णाद्रमुक नेते आणि माजी आमदार बी. सत्यनारायणन यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता.









