चित्रदूर्ग येथे एस टी चालक, वाहक मारहाण प्रकरण
अडीच लाखांचे नुकसान : प्रवाशांचे मात्र हाल
दोन राज्यातील वाहतूक सुरळीत होण्याची गरज
कोल्हापूर
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी चालक व वाहकाला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मारहाण झाली आहे. यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटी बसेस तीन दिवसापासून बंद करण्यात आल्या आहेत. बसेस बंदचा फटका परिवहन महामंडळाला बसत आहे. तर प्रवाशांचे हाल होत आहेत. सोमवारी कोल्हापूर विभागातून कर्नाटकात जाणाऱ्या एसटीच्या २३८ फेऱ्या रद्द करण्यात आल्याने सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगारे यांनी दिली.
महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये भाषिक वाद पेटला आहे. या वादाचा फटका मात्र दोन्ही राज्यातील एसटी बसेसवर झाला आहे. तीन दिवसापासून कर्नाटक परिवहन महामंडळाच्या बसेस महाराष्ट्रात येत नाहीत आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस कर्नाटकात सोडणे बंद केले आहे. यामुळे कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहे. सोमवारी कोल्हापूर विभागातील सर्व आगारातील एसटीच्या एकूण २३८ फेऱ्या रद्द झाल्या, तर अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले.
सोमवारी मध्यवर्ती बसस्थानकातील कर्नाटकात जाणाऱ्या बेळगाव फलाटावर प्रवाशांचा शुकशुकाट होता. तसेच काही प्रवासी बसची प्रतीक्षा करत होते.
खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून मनमानी दर
एसटी बसेस बंद असल्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून घेतला जात आहे. त्यांच्याकडून मनमानी दर आकारला जात असून नाईलाजास्तव या पर्यायकडे वळत आहेत.
राज्य पातळीवर चर्चा
दोन्ही राज्यातील बसेसची वाहतूक पूर्ववत होण्यासाठी राज्य पातळीवर चर्चा सुरु आहे. मात्र सोमवारपर्यंत तोडगा निघाला नव्हता.आज (दि 25) मार्ग निघेल अशी आशा आहे.
शिवराज जाधव विभाग नियंत्रक कोल्हापूर
एसटी सेवा पूर्ववतसाठी प्रयत्न
महाराष्ट्र आणि कर्नाटकातील बससेवा बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. यामुळे ही सेवा पूर्ववत होण्यासाठी परिवहन मंत्र्यांशी चर्चा करणार आहे.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर








