चॅम्पियन्स ट्रॉफीतील पाकच्या खराब कामगिरीनंतरचे परिणाम, निवड समितीतही बदल शक्य
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तान व दुबईमध्ये सुरू असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील यजमान पाकच्या निराशाजनक कामगिरीने नाराज झालेल्या माजी खेळाडूंनी संघावर व साहायक स्टाफवर सडकून टीका केली आहे. या पराभवाचे परिणाम आता दिसू लागले असून हंगामी प्रशिक्षक माजी वेगवान गोलंदाज अकिब जावेद यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याचे पीसीबीमधील सूत्राने बोलून दाखविले आहे.
पाकने पारंपरिक प्रतिस्पर्धी भारताविरुद्धची लढत सहा गड्यांनी गमविली. त्याआधी पहिल्या सामन्यात न्यूझीलंड संघानेही त्यांना 60 धावांनी हरविले होते. या दोन पराभवामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर हंगामी प्रशिक्षक अकिब जावेद यांना पदमुक्त करण्यात येणार असल्याचे या सूत्राने सांगितले. ‘चॅम्पियन्स ट्रॉफीतील पराभवानंतर संघाच्या परफॉर्मन्सवर टीकेची झोड उठली आहे. संघाला एकच नवा कोच मिळणार आहे की, रेड बॉल व व्हाईटबॉल क्रिकेटसाठी वेगवेगळे कोच नियुक्त करणार याबाबत अद्याप मंडळाने निर्णय घेतलेला नाही. मात्र विद्यमान कोच व त्यांचे साहायक यांची उचलबांगडी होणार हे निश्चित आहे,’ असे या सूत्राने स्पष्ट केले. ‘गेल्या वर्षापासून पाक बोर्ड प्रशिक्षक व निवड समिती सदस्य वारंवार बदलत असल्याने नवे उमेदवार शोधण्याचे त्यांच्यासमोर कठीण आव्हान असेल,’ असेही तो म्हणाला.
गॅरी कर्स्टन यांनी गेल्या वर्षी प्रमुख प्रशिक्षकपद सोडल्यानंतर पीसीबी चेअरमन मोहसिन नकवी यांनी अकिब जावेद यांची मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. नंतर जेसन गिलेस्पी यांनी पद सोडल्यानंतर द.आफ्रिका, विंडीज यांच्याविरुद्ध होणाऱ्या कसोटींसाठी त्यांच्यावर हंगामी प्रशिक्षकपदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. येत्या मार्च-एप्रिलमध्ये पाक संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार असून तेथे पाच टी-20 व तीन वनडे सामने होणार आहेत, यासाठी कायमचा प्रशिक्षक नियुक्त करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार असल्याने पीसीबीला प्रशिक्षक निवडीसाठी पुरेसा वेळ देता आला नव्हता. पण आता त्याला प्राधान्य देण्यात येईल, अशी माहितीही या सूत्राने दिली. निवड समितीबाबतही लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.









