पुतीन यांच्यासमोर ठेवली युद्धकैद्यांच्या अदला-बदलीची अट : तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन यांच्यात संघर्ष
वृत्तसंस्था/ कीव
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना रशियासोबतचे तीन वर्षांचे युद्ध संपवण्यासाठी सर्व युद्धकैद्यांच्या अदलाबदलीचा प्रस्ताव दिला. ‘रशियाने सर्व युक्रेनियन सैनिक आणि नागरिकांना सोडले पाहिजे’ असे झेलेन्स्की यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कीव येथे झालेल्या शिखर परिषदेला संबोधित करताना स्पष्ट केले. युक्रेन सर्व रशियन युद्धकैद्यांना सोडण्यास तयार आहे. युद्ध संपवण्याची सुरुवात करण्याचा हा एक योग्य मार्ग असेल, असे झेलेन्स्की पुढे म्हणाले. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर हल्ला केला होता. तेव्हापासून दोन्ही देशांमधील युद्ध सुरूच आहे.
ऑक्टोबर 2024 मध्ये रशिया आणि युक्रेनने संयुक्त अरब अमिरातीच्या च्या मध्यस्थीखाली प्रत्येकी 95 युद्धकैद्यांची सुटका केली. युक्रेनियन संसदेचे मानवाधिकार आयुक्त दिमित्रो लुबिनेट्स म्हणाले की, 2022 मध्ये युद्ध सुरू झाल्यापासून दोन्ही देशांनी कैद्यांची देवाणघेवाण करण्याची ही 58 वी वेळ आहे. यापूर्वी, दोन्ही देशांनी सप्टेंबरमध्ये एकमेकांच्या 103-103 कैद्यांना सोडले होते. दरम्यान, युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झेलेन्स्की यांनी रशियन आक्रमणासमोर युक्रेनच्या प्रतिकाराची आणि शौर्याची प्रशंसा केली.
झेलेन्स्की यांनी यापूर्वी आपल्या देशाला नाटोचे सदस्यत्व मिळाले तर स्वत: युक्रेनचे अध्यक्षपद तात्काळ सोडण्यास तयार असल्याचे वक्तव्यही केले आहे. ‘जर माझ्या कृतीमुळे युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित होत असेल, जर तुम्हाला खरोखरच मी माझे पद सोडावे असे वाटत असेल, तर मी त्यासाठी तयार आहे.’ असे कीवमधील पत्रकार परिषदेत बोलताना झेलेन्स्की म्हणाले होते. युक्रेनला नाटो सदस्यत्व मिळाल्यास मी राष्ट्राध्यक्षपदाचा तात्काळ राजीनामा देण्यास तयार असल्याचेही त्यांनी रविवारी स्पष्ट केले होते.
डोनाल्ड ट्रम्प यांना मदतीचे आवाहन
झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना युक्रेनमधील परिस्थिती समजून घेण्याचे आणि रशियन आक्रमणाविरुद्ध त्यांच्या देशाला ‘सुरक्षा हमी’ देण्याचे आवाहन केले. ते ट्रम्प यांना युक्रेनचे भागीदार आणि कीव-मॉस्कोमधील मध्यस्थ म्हणून पाहू इच्छितात. आम्हाला अमेरिकेकडून सुरक्षा हमीची नितांत गरज असल्याचे झेलेन्स्की म्हणाले.









