सत्ताधाऱ्यांचा पराभव, युती सरकार स्थापन होणार
वृत्तसंस्था / बर्लिन
जर्मन संसदेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत उजव्या शक्तींची सरशी झाली आहे. सत्ताधाऱ्यांचा पराभव झाला असून डाव्या आणि अतिडाव्या पक्षांनाही मोठा धक्का बसला आहे. उजव्या मानल्या गेलेल्या जर्मन काँझर्व्हेटिव्ह पक्षाला सर्वाधिक 208 जागा मिळाल्या असून ‘अल्टरनेटीव्ह फॉर जर्मनी’ (एएफडी) या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाच्या 152 जागा मिळाल्या आहेत. सत्ताधारी असणाऱ्या एसपीडी पक्षाला केवळ 120 जागा मिळाल्या असून तो सत्तेबाहेर गेला आहे. सर्वाधिक 208 जागा जर्मन काँझर्व्हेटिव्ह पक्षाला मिळाल्याचे दिसून येत आहे.
या निवडणुकीत सर्वाधिक वाढ अतिउजव्या एएफडी या पक्षाची झाल्याचे दिसून येत आहे. या पक्षाला 20.8 टक्के मते मिळाली असून 152 जागांची प्राप्ती झाली आहे. मागच्या निवडणुकीच्या तुलनेत या पक्षाचे आपली मते आणि जागा यांच्यात दुप्पट वाढ केली आहे. या पक्षाला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा पाठिंबा लाभला होता. पूर्वीच्या पूर्व जर्मनी भागात या पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून पश्चिम जर्मनी भागातही या पक्षाने मोठी प्रगती साधल्याचे दिसून येत आहे.
मर्झ चान्सेलर होण्याची शक्यता
सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या पक्षाचे नेते प्रेडरिक मर्झ जर्मनीचे नवे प्रमुख नेते किंवा चान्सेलर होण्याची शक्यता आहे. जर्मनीच्या संसदेत एकंदर 630 जागा आहेत. 316 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. मर्झ यांच्या पक्षाला 208 जागा मिळाल्या असून या पक्षाला बहुमतासाठी अद्याप 108 जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांना युतीसाठी अन्य पक्षांशी चर्चा करावी लागणार आहे.
तरीही विरोधी पक्षातच…
या निवडणुकीत सर्वाधिक वाढ नोंदविलेल्या एएफडी या अतिउजव्या पक्षाला भरघोस यश मिळूनही प्रमुख विरोधी पक्ष म्हणूनच बसावे लागणार आहे. कारण मर्झ यांचा पक्ष या पक्षाशी युती करण्याची शक्यता जवळपास नाही. एएफडी हा पक्ष मर्झ यांच्या पक्षाचा सर्वात तगडा प्रतिस्पर्धी आहे. त्यामुळे मर्झ यांना सध्या सत्ताधारी असलेल्या एसपीडी या पक्षाशीच युती करण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तसेच अन्य लहान पक्षांनाही आपल्यासह घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, असे दिसत आहे. एकंदर, या निवडणुकीत बव्हंशी मतदारांचा कल उजव्या किंवा अतिउजव्या पक्षांकडे असल्याचे पहावयास मिळते, असे तज्ञांचे मत आहे.
स्थलांतर प्रमुख मुद्दा
जर्मनीत मुस्लीम देशांमधून झालेले मोठ्या प्रमाणातील स्थलांतर हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा होता. या स्थलांतरीतांमुळे अनेक समस्या या देशात निर्माण झाल्याने त्यांच्या विरोधात मोठा असंतोष स्थानिक जनता व्यक्त करीत आहे. अतिउजव्या एएफडी या पक्षाने या स्थलांतरितांची हकालपट्टी करावी अशी मागणी करत ही निवडणूक लढविली होती. या पक्षाला मिळालेल्या यशाचे प्रमाण पाहता हा पक्ष पुढच्या निवडणुकीत सत्तेवर येऊ शकतो, असे तज्ञांचे मत आहे.
अमेरिकेपासून स्वातंत्र्य हे ध्येय
फ्रेडरिक मर्झ यांनी आपल्या निवडणुकीचा परिणाम समोर येत असताना काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. अमेरिकेवर युरोप अवलंबून असता कामा नये, असे आग्रही मत त्यांनी व्यक्त केले आहे. यासाठी युरोपियन महासंघ अधिक भक्कम करण्याची त्यांची योजना आहे. सध्या जर्मनी हे आर्थिकदृष्ट्या युरोपियन महासंघातले सर्वात प्रबळ राष्ट्र आहे. ब्रिटन, फ्रान्स आदी देशांशी सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आहे. त्यामुळे पुढच्या काळात बऱ्याच स्वारस्यपूर्ण घडामोडी जर्मनी आणि युरोपात घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो हे देखील या आघाडीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे. तथापि, या साऱ्याचा परिणाम काय होणार हे नंतरच समजणार आहे.
जर्मनीचे नवे पक्षीय बलाबल
एकंदर जागा 630
सीडीयु, सीएसयु 208 (28.52 टक्के मते)
एएफडी 152 (20.8 टक्के मते)
एसपीडी 120 (16.41 टक्के मते)
ग्रूने पक्ष 85 (11.61 टक्के मते)
डे लिंगे 64 (8.77 टक्के मते)
एसएसडब्ल्यू 1 (0.15 टक्के मते)
बीएसडब्ल्यू 0 (4.97 टक्के मते)









