आमदार विठ्ठल हलगेकरसह सेवादल विभागाच्या दोनशे सेवकांचा सहभाग
खानापूर : संत निरंकार मिशन बेळगाव शाखेच्यावतीने येथील मलप्रभा नदीघाटाची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नदीघाटाच्या दक्षिणेकडील घाटावर प्रचंड प्रमाणात वाळू आणि घाण साचल्याने दक्षिणेकडील घाट पूर्णपणे मुजून गेला होता. निरंतर मिशनच्या ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ या मोहिमेच्या अंतर्गत मलप्रभा नदीघाट मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. यात संत निरंकार सत्संग मंडळाचे सेवादल विभागाच्या जवळपास दोनशे सेवकांनी भाग घेऊन घाटाची सफाई केली. आमदार विठ्ठल हलगेकर आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणी हलगेकर यांच्या हस्ते सकाळी 7 वाजता नदीघाट स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली.
संत निरंकार मिशन बेळगाव विभागाच्या शशी आनंदजी यांनी संत निरंकार मिशनच्या स्वच्छ जल, स्वच्छ मन याबाबत माहिती देताना म्हणाल्या, देशात प्रत्येक माणसाचे मन निर्मळ झाले पाहिजे. प्रत्येक माणसाने प्राण्यांबद्दल दया, करुणा जपली पाहिजे. माणसाने माणसाशी ईश्वराची अनुभूती घेऊनच वागले पाहिजे, मनात कोणत्याही प्राण्याचा मत्सर घडू नये. हेच प्रत्येक माणसाच्या जीवनाचे वास्तव आहे. तसेच निसर्गाने माणसाला भरभरुन दिले आहे. आणि त्यातील एक भाग म्हणून आपल्या जीवनाशी अत्यंत जरुरीचे असलेले पाणी हे नदीच्या रुपाने आम्हाला निसर्गाने दिले आहे. मात्र देशातील सर्व नद्या आज प्रदूषित होत आहेत. यासाठी जसे माणसाचे मन स्वच्छ तसेच नदीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी मिशनच्या माध्यमातून नदी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. प्रत्येकाने नदीच्या स्वच्छतेसाठी योगदान दिले पाहिजे, तरच माणसाचे जीवन समृद्ध होईल, नदीचे प्रदूषण होणार नाही. प्रत्येकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, संत निरंकार मिशनच्या उपक्रमाबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच सपत्निक घाटाच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. यावेळी संत निरंकार सेवा दलाच्यावतीने दक्षिणेकडील घाटाची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. तसेच नदीच्या पात्रात साचलेला केरकचरा यासह देवदेवतांचे नदीत सोडण्यात आलेले फोटो तसेच इतर साहित्य बाजूला काढून भक्तांच्या वापरासाठी घाट मोकळा करून दिला आहे. यावेळी नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, उपनगराध्यक्षा जया भुतकी, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, अप्पय्या कोडोळी, निरंकार मिशनचे व्ही. एन. लासेजी आणि संत निरंकार मिशन बेळगाव युनिट क्रमांक 499 चे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.









