सांगता सोहळ्याला 30 हजारहून अधिक भाविकांची उपस्थिती : ‘लक्ष्मी माता की जय, हर हर महादेव’चा अखंड जयघोष
वार्ताहर/नंदगड
गेल्या बारा दिवसांपासून सुरू असलेल्या नंदगड येथील लक्ष्मीदेवीच्या यात्रोत्सवाची रविवारी यशस्वी सांगता झाली. देवीला सीमेकडे निरोप देण्यासाठी 30 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. नियोजित वेळेनुसार सायंकाळी 6 वाजता गदगेवरील मंदिरातून लक्ष्मीदेवीला बाहेर काढण्यात आले. मिरवणुकीसाठी लांब लाकडे बांधून राम मंदिराची प्रतिकृती असलेल्या गदगा मंदिरासमोर देवीला फिरविण्यात आले. यावेळी गदगेभोवती अनेक फेरे घालण्यात आले. दरम्यान, मूर्तीला चाळीसहून अधिक युवकांनी हातात घेतले होते. यावेळी ‘लक्ष्मी माता की जय, हर हर महादेव’चा जयघोष करण्यात येत होता. मिरवणुकीत भंडारा उधळण्यात येत होता. गदगेभोवती देवीची मिरवणूक काढताना उपस्थित सर्वच भाविकांना देवीचे सुलभ दर्शन झाले. रूढी-परंपरेनुसार 7 वाजता गदगा परिसरातील कमानीपर्यंत देवीच्या मूर्तीला मागे-पुढे घेण्यात आले. त्यानंतर मातंगी देवीसाठी घातलेल्या गवती झोपडीला धार्मिक विधीनंतर आग लावण्यात आली.
त्यानंतर लक्ष्मीदेवीचे सीमेकडे प्रस्थान झाले. रात्री उशिरा धार्मिक कार्यक्रमांनंतर देवीची मूर्ती पुन्हा मंदिरात आणण्यात येणार आहे. रविवारी रात्री 12 पासून गुऊवारी पहाटे 4 पर्यंत गावातील लोकांनी घराबाहेर पडू नये, अशी सूचना यात्रा उत्सव समितीतर्फे देण्यात आली. यात्रेची सांगता झाली असली तरी गदगेवर उभारण्यात आलेली राम मंदिराची आकर्षक कलाकृती पुढे पाच दिवस सर्वांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी असलेली दुकाने व मनोरंजनाची साधनेही पाच दिवस राहणार असल्याचे सांगण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत यात्रा स्थळी असलेल्या पाळण्यांचा आनंद युवक-युवतींनी लुटला. त्यामुळे यात्रेच्या ठिकाणी उशीरापर्यंत गर्दी दिसून येत होती. नंदगड लक्ष्मीदेवी यात्रा कमिटीचे प्रयत्न, पोलिसांनी रहदारी नियंत्रणासाठी केलेले नियोजन तसेच हेस्कॉम कर्मचारी व जनतेने वेगवेगळ्या परीने दिलेले सहकार्य यामुळे सर्वांचेच धन्यवाद मानले जात होते.









