‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजना : बेळगाव-खानापुरात 2600 अर्ज दाखल : वर्षाकाठी विजबिलाचे 9600 रु. वाचणार
बेळगाव : प्रत्येक घर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे व अधिकाधिक पारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून ऊर्जा निर्मिती करावी, या उद्देशाने ‘पीएम सूर्यघर’ योजना सुरू करण्यात आली. घरावर रुफटॉप सोलार पॅनेल बसविण्यासाठी या योजनेतून अनुदान दिले जाणार आहे. 1 ते 3 किलो वॅटसाठी अनुदान मिळणार असून विजेच्या तक्रारी कायमच्या बंद करण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे. केवळ घरापुरतीच वीज न वापरता अतिरिक्त वीज हेस्कॉमला विक्री करता येणार आहे. धरणांमधील पाणीसाठा कमी झाल्यानंतर वीज निर्मितीचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे बऱ्याच वेळा भारनियमन करावे लागते. प्रत्येकालाच मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध आहे. याचा वापर करून वीज निर्मिती करून स्वयंपूर्ण घर तयार करण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. पीएम सूर्यघर या योजनेतून लहान कुटुंबांना विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. घराच्या छतावर 10 फूट रुंद व 10 फूट लांब जागा उपलब्ध असल्यास सूर्य घर योजनेद्वारे सोलार पॅनेल बसविले जाऊ शकतात.
लहान कुटुंबांचा विचार करूनच ही योजना सुरू करण्यात आली. सूर्यघर योजनेतून घरांवर सोलार पॅनेल बसविले जाणार आहेत. यामधून तयार होणारी वीज ही त्या घरात वापरली जाणार आहे. उर्वरित वीज हेस्कॉमला विक्री केली जाणार आहे. प्रति युनिट 2.43 रुपये दराने हेस्कॉम ग्राहकांकडून वीज खरेदी करणार आहे. यामुळे अतिरिक्त वीज विक्री करून ग्राहकांना पैसे मिळणार आहेत. योजनेसाठी http://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर अर्ज दाखल करता येतो. राष्ट्रीय पोर्टलवर अर्ज दाखल केल्यानंतर हेस्कॉमच्या पोर्टलवर लिंक लॉग इन होईल. याद्वारे मिळालेल्या क्रमांकानुसार तपशील पाहता येते. या पोर्टलवरील अधिकृत सोलार कंपन्या निवडाव्या लागतील. घरावर सोलार रुफटॉप काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या नोंदी द्याव्या लागणार आहेत. त्यानंतर ग्राहकाला योजनेचे अनुदान बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. जितका किलो वॅट वीजपुरवठा घरासाठी मंजूर करून घेतला आहे, तितक्याच किलो वॅटचा सोलार प्रकल्प घरावर लावला जाणार आहे. अंदाजे 1 किलो वॅट रुफटॉप पॅनेल उभारण्यासाठी 60 ते 80 हजार रुपये खर्च येणार आहे. यासाठी 30 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे. यामुळे वर्षाकाठी विजबिलाचे 9600 रुपये वाचणार आहेत. यासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून 7 टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. प्रत्येक घर विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे या उद्देशाने पीएम सूर्यघर योजना लागू करण्यात येत आहे.
गृहज्योतीमुळे सूर्यघर योजनेला फटका
कर्नाटक राज्य सरकारने गृहज्योती योजना लागू केली. या योजनेद्वारे 200 युनिटपर्यंतची मोफत वीज दिली जात आहे. सध्या मोफत वीज मिळत असल्याने सोलारसाठी खर्च करण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. सूर्यघर योजनेतून अनुदान दिले जाणार असले तरी उर्वरित खर्च ग्राहकालाच करावा लागणार आहे. जोवर मोफत वीज मिळते तोवर हा खर्च कशासाठी करायचा? या उद्देशाने प्रधानमंत्री सूर्यघर योजनेला अल्प प्रतिसाद मिळत आहे.
अर्ज हेस्कॉमकडे पडून
मध्यंतरी पोस्ट विभागाच्यावतीने घरोघरी जाऊन पीएम सूर्यघर योजनेची माहिती देण्यात आली. तसेच या योजनेसाठी अर्जदेखील करण्यात आले. परंतु पुढील प्रक्रिया करण्याबाबत नागरिकांना तितकीशी माहिती नसल्याने अनेक अर्ज तसेच पडून आहेत. कागदपत्रांची पूर्तता तसेच सोलार रुफटॉप बसविणाऱ्या कंपनीची निवड करण्यात आली नसल्याने अर्ज हेस्कॉमकडे पडून आहेत. त्यामुळे अर्ज केल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
नागरिकांनी लाभ घ्यावा
‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजना ही लहान कुटुंबांसाठी अतिशय महत्त्वाची योजना आहे. सोलारचा वापर वाढावा यासाठी अनुदान देऊन रुफटॉप पॅनेल बसविले जाणार आहेत. सुरुवातीच्या काही वर्षातच सोलार रुफटॉपसाठी केलेला खर्च वजा होणार आहे. त्यामुळे पुढील काळात नागरिकांना सोलारद्वारे मोफत वीज वापरता येईल. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा.
– मनोहर सुतार (कार्यकारी अभियंता, हेस्कॉम शहर)
सूर्यघर योजनेसाठी दाखल झालेले अर्ज
- बेळगाव शहर-178
- बेळगाव ग्रामीण-2175
- खानापूर-261
ग्राहकांना दिले जाणारे अनुदान
- 1 किलो वॅट 30 हजार रु.
- 2 किलो वॅट 60 हजार रु.
- 3 किलो वॅट 78 हजार रु.









