मतमोजणीनंतर आज निकाल जाहीर होणार
वृत्तसंस्था/ बर्लिन
जर्मनीमध्ये रविवारी सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. जर्मनीमध्ये मतदानाची वेळ सकाळी 8 ते सायंकाळी 6 (भारतीय वेळेनुसार दुपारी 12:30 ते रात्री 10:30) अशी आहे. यात 8.4 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात 6 कोटी लोक सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतील. मतदान संपल्यानंतर मतमोजणी देखील सुरू होईल. मतदान संपल्यानंतर काही तासांतच सुरुवातीचे निकाल स्पष्ट होतील. सोमवारी निकाल अधिकृतपणे जाहीर केला जाईल.
या निवडणुकीत सध्याचे चान्सेलर स्कोल्झ यांची सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) सर्वेक्षणात मागे पडताना दिसत आहे. विरोधी ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियनचे (सीडीयू) फ्रेडरिक मॅट्झ हे चान्सलरपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. याशिवाय, अॅलिस वेडेलचा कट्टरपंथी अल्टरनेटिव्ह फॉर जर्मनी (एएफडी) देखील लोकप्रिय होत आहे. सर्वेक्षणानुसार, 29 टक्के लोक फ्रेडरिक मॅट्झच्या पक्षाला समर्थन देतात, तर 21 टक्के लोक कट्टरपंथी अॅलिस यांच्या ‘एएफडी’ला समर्थन देतात. चान्सलर स्कोल्झ यांची ‘एसपीडी’ 16 टक्के समर्थनासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या ग्रीन पार्टीला 12 टक्के आणि फ्री डेमोक्रॅटिक पार्टीला 7 टक्के मते मिळू शकतात. त्यामुळे हे दोघेही किंगमेकरच्या भूमिकेत येऊ शकतात.









