सांगली :
‘फॅशन शो’मध्ये मेट्रोसिटीची मक्तेदारी असणं ही बाब गेली कित्येक दशकं महाराष्ट्राने अनुभवली आहे. त्यामुळे ‘फॅशन शो’ म्हणलं की पुणे मुंबईच्या मुलींचेच त्यात करिअर होऊ शकते, अशी आपल्याकडच्या लोकांची मानसिकता आहे. पालकसुद्धा मुलींना या क्षेत्रात करिअर करून देण्यास सहसा परवानगी देत नाहीत. अशातच मूळचे तासगाव तालुक्यातील पेडचे व सद्या सांगलीत वास्तव्यास असलेले नितीन रणखांबे यांनी आपली मुलगी तनुजा रणखांबे हिच्या स्वप्नांवर व मेहनतीवर विश्वास ठेवून तिला फॅशन क्षेत्रात करिअर करण्यास पूर्ण मुभा दिली. मुलीने या संधीचे सोने करत अपार कष्ट घेतले. पुण्यात पार पडलेल्या ‘भारताची सौंदर्यवती’ या स्पर्धेत ती विजेती ठरली असून ‘महाराष्ट्राची सौंदर्यवती’ होण्याचा मान तिने मिळवला आहे.
द रॉयल ग्रुप, पुणे यांच्या वतीने हा ‘फॅशन शो’ आयोजित केला जातो. याची प्राथमिक फेरी प्रत्येक जिल्ह्यात होते. जिल्ह्यातून निवडलेल्या मॉडेल पुढे राज्यस्तरीय ‘शो’ साठी पात्र ठरतात. अशा एकूण ३६ जिल्ह्यातील निवडक ३६ मॉडेल्स पैकी राज्यात विजेती होण्याचा बहुमान तनुजा रणखांबे हिला मिळाला आहे. आता तिची दिल्ली येथे होणाऱ्या भारताची सौंदर्यवती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ही सांगली जिल्ह्यासाठी अभिमानाची आणि मॉडेलिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे. तनुजा ही मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून ती सद्या बी. कॉम. च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. गेल्या २ वर्षापासून ती मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी धडपड करत आहे. अभिनय क्षेत्रात सुद्धा तिची घोडदौड सुरूच असून तिने नुकतेच ‘रंग लागला’ हे अल्बम साँग आणि काही कमर्शियल जाहिराती देखील केल्या आहेत.








