रत्नागिरी :
रत्नागिरी रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर उभ्या असलेल्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीत तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी सकाळी ५.१५ च्या सुमारास घडली. घडल्या प्रकाराने हादरुन गेलेल्या पीडित तरुणीने या घटनेची खबर रेल्वे पोलिसांना दिली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी आरोपीला चिपळूण रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेतले. सुरक्षा व्यवस्था असलेल्या रत्नागिरी रेल्वेस्थानकात घडलेल्या या प्रकाराने महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
निफ्रान इन्तिखाब अल्जी (३०, रा. रत्नागिरी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित तरुणी ही सकाळी ५.३०च्या रत्नागिरी-दिवा पॅसेंजर गाडीने खेड येथे जात होती. सकाळी गाडीला जास्त प्रवासी नसल्याने ती बसलेल्या गाडीचा डबा रिकामाच होता. सकाळी ५.१५ च्या सुमारास संशयित आरोपी हा दबक्या पावलांनी तरुणीच्या पाठीमागील बाजूने आला. यावेळीबेसावध असलेल्या तरुणीचा त्याने विनयभंग केला, असे पोलीस तक्रारीत म्हटले आहे.








