कोल्हापूर :
बनावट नोटा बाजारात खपवण्यापूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी आणि करवीर पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून सिद्धेश श्रीकांत घाटगे (वय 26, रा. कळंबा) व विकास वसंत पानारी (35, रा. शिंगणापूर, ता. करवीर) या दोघांना ताब्यात घेतले होते. शनिवारी त्यांची कसुन चौकशी केली असता, त्यांनी झटपट श्रीमंत होण्यासाठी सोशल मिडीयावरील एका चॅनेलवरून शिकून नोटांची छपाई केल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तपासात आणखी दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली असल्याची माहीती करवीर पोलिसांनी दिली.
बनावट नोटा प्रकरणतील दोघेही आरोपी शिकलेले आहेत. घाटगे हा मॅकेनिक आहे, तर पानारी हा मूतींकार आहे. झटपट श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्यांनी बनावट नोटा छापून त्या चलनात आणण्याचे ठरवले. सोशल मिडीयावरील एका चॅनेलवरून नोटांच्या छपाई कशी करतात याची माहिती घेतली. पण, परदेशातून मागवलेल्या कागदाचे कुरिअर सापडल्याने ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या समोर आले.
कळंब्यातील दत्तोबा शिंदे नगरात राहणारा सिद्धेश घाटगे हा दहावी पास आहे. तो एका गॅरेजमध्ये मेकॅनिकचे काम करतो. शिंगणापुरातील विकास पानारी याने बीएची पदवी घेतली असून, तो मूर्तीकार आहे. दोघेही पहिल्यापासुन मित्र आहेत. त्यांना आर्थिक चणचण भासत होती. यातून ते झटपट पैसे मिळविण्याचे मार्ग शोधत होते.
- दोन महिन्यापूर्वी प्लॅनिंग
दोन महिन्यांपूर्वी त्यांनी बनावट नोटा छापण्याचे प्लॅनिंग केले होते. त्यासाठी हाँगकाँगमधून कुरिअरद्वारे मागवलेला हाय सेक्युरिटी थ्रेड कागद मिळताच त्यांनी नोटांचे डिझाईन तयार करून 50, 200 आणि 500 रुपयांच्या नोटांची छपाई करून पाहिली. प्रथम त्यांनी 500 च्या चार, 200 च्या चार आणि 50 च्या सहा बनावट नोटा छापल्या.
- गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता
या प्रकणरामध्ये आणखी दोघांचे समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून नोटांचे डिझाईन तयार करून देण्यासह त्या छपाई केली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. त्यामुळे या गुह्याची व्याप्ती वाढण्याच शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
- एक संशयित कर्नाटकातील
चौकशीत निष्पन्न झालेल्या दोघा संशयाता पैकी एकजण कर्नाटकातील असल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिंदे यांनी दिली. त्यामुळे बनावट नोटांचे कनेक्शन कर्नाटकशी असल्याचे सिद्ध होत आहे. त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाले असल्याची माहिती त्यांनी दिली.








