कोल्हापूर / कृष्णात चौगले :
विद्यमान संचालक मंडळाची मुदत संपूनही जिह्यातील 702 दूध संस्थांनी पंचवार्षिक निवडणूक विहीत कालावधीत घेण्यासाठी कसुर केला. निवडणूक पात्र मतदारांची यादीही सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयाकडे सादर केलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था नियमानुसार तालुका सहकारी निवडणूक अधिकारी स्वत: अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीमार्फत मतदारांची प्रारुप यादी तयार करण्याची तरतुद आहे. त्यानुसार जिह्यातील सुमारे 702 संस्थांची मतदार यादी तयार करून सहाय्यक दुग्ध निबंधक कार्यालयास सादर करण्यासाठी संबंधित संस्थांवर प्राधिकृत अधिकारी नियुक्त केले आहेत, अशी माहिती सहाय्यक निबंधक (दुग्ध) प्रदीप मालगावे यांनी ‘तरुण भारत संवाद’शी बोलताना दिली.
‘केंद्र शासनाकडून ‘नॅशनल को ऑपरेटीव्ह डाटा बेस’ या प्रणालीतून सर्व सहकारी संस्थांची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्या संस्थेचे कामकाज सुरु आहे? कोणत्या संस्थेची निवडणूक प्रक्रिया राबविली गेली आहे? लेखापरिक्षण झाले आहे काय? आदी संस्थांबाबतची सर्व माहिती शासनाने दिलेल्या प्रणालीत एकत्र करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे संस्थांबाबतची सर्व माहिती एकत्रित होत आहे. त्यामुळे जिह्यातील किती संस्थांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविलेली नाही, याची परिपूर्ण माहिती सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे अशा निष्क्रिय संस्थांवर सहाय्यक दुग्ध निबंधकांनी लक्ष केंद्रित केले असून या संस्थांची निवडणूक प्रक्रिया तत्काळ राबविण्याची त्यांच्याकडून कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार त्यांनी संबंधित संस्थांना नोटीस पाठवून त्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. तरीही जिह्यातील सुमारे सातशेहून अधिक संस्थांनी निवडणुका घेण्याबाबतची प्रक्रिया सुरु केलेली नाही. यापूर्वी 741 अवसायनातील दूध संस्थांपैकी 506 संस्थांची नोंदणी थेट रद्द केली असल्याचे मालगावे यांनी सांगितले.
महाराष्ट्र सहकारी संस्था नियमानुसार प्रारूप मतदारयादी समितीची मुदत संपण्याच्या 120 दिवस अगोदर संस्था सचिवांनी यादी सहाय्यक निबंधक (दुग्ध) कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे. तसेच नविन संस्था असल्यास हंगामी समितीची मुदत संपताच तत्काळ मतदार याद्या निवडणूक कार्यालयाकडे सादर करणे अपेक्षित आहे. त्यानुसार, ज्या संस्थेच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. तसेच ज्या संस्था नव्याने नोंदणी झालेल्या आहेत व ज्या संस्थांच्या नोंदणीनंतरचा 1 वर्षाचा कालावधी पूर्ण झालेला आहे, अशा सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू करण्याबाबत राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सुचित केले आहे. या आदेशामध्ये याद्या प्राप्त न झालेल्या संस्थेच्या मतदार यादीसाठी 1 जानेवारी 2025 ही अर्हता दिनांक निश्चित केलेली होती. त्यानुसार संस्थेच्या निवडणूकीची प्रारूप मतदार यादी या कार्यालयास सादर करणे आवश्यक होते. तरीही संबंधित संस्थांनी मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत.
- जिह्यातील 702 संस्था सहाय्यक दूग्ध निबंधकांच्या अजेंड्यावर
जिह्यातील 753 दूध संस्थांच्या विद्यमान संचालक मंडळाचा कार्यकाल पूर्ण होऊन 3 वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. यापैकी 50 संस्थांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली असून प्रारुप मतदार याद्या सादर केल्या आहेत. तर अद्याप 702 संस्थांनी अद्याप पाठ फिरवली आहे. यामध्ये आजरा तालुक्याती 37, करवीर 114, कागल 74, गगनबावडा 8, गडहिंग्लज 58, चंदगड 60, पन्हाळा 79, भुदरगड 86, राधानगरी 95, शाहूवाडी 74, शिरोळ 32, हातकणंगले तालुक्यातील 36 संस्थांचा समावेश आहे.
- प्रारुप मतदार यादीची जबाबदारी प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे
जिह्यातील सातशेहून अधिक दूध संस्थांमधील संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षापूर्वीच संपला आहे. त्यामुळे सहाय्यक निबंधक (दूग्ध) कार्यालयाकडून निवडणूक प्रक्रिया तत्काळ राबविण्यासाठी संबंधित दुध संस्थांना वेळोवेळी नोटीस देऊन सूचना दिल्या आहे. तरी देखील या संस्थांकडून अद्याप सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे मतदार याद्या सादर केलेल्या नाहीत. त्यामुळे संबंधित दूध संस्थांवर प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती करून त्यांना प्रारुप मतदार याद्या सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
प्रदीप मालगावे, सहाय्यक निबंधक (दूग्ध)








