वीजबिल वसुलीसाठी गेला असता हल्ला
प्रतिनिधी/ बेळगाव
विजेची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेल्या लाईनमनला जबर मारहाण केल्याची घटना शनिवारी गोकाक तालुक्यातील धुपदाळ गावामध्ये घडली. यामध्ये लाईनमन गंभीर जखमी झाला असून संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत हेस्कॉमचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत होते.
धुपदाळ येथील खादीरसाब पठाणसाब कोतवाल यांचे अंदाजे 17,146 रुपयांचे वीजबिल थकले होते. मागील सात ते आठ महिन्यांपासून हे बिल भरण्यासाठी घटप्रभा हेस्कॉम विभागाकडून त्यांना वारंवार सूचना करण्यात येत होती. अखेर दुर्लक्ष केल्याने वीजकनेक्शन तोडण्यात आले. त्यानंतर कोतवाल यांनी अनधिकृतरीत्या वीजजोडणी घेतल्याचे हेस्कॉमच्या लक्षात आल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार लाईनमन कोतवालांच्या घरी गेले होते.
लाईनमन प्रमोद माळगी व त्यांचे सहकारी हे अनधिकृत कनेक्शन हटविण्यासाठी गेले असता कोतवाल कुटुंबीय व लाईनमनमध्ये बाचाबाची झाली. शाब्दिक वादावादीनंतर लाईनमन व कोतवाल कुटुंबीयांमध्ये हाणामारी झाली. यानंतर दगड, तसेच इतर साहित्याने लाईनमनवर हल्ला केला गेला. लाईनमनने खादीरसाब यांच्यावर हात उचलल्यानंतर एका व्यक्तीने लाईनमन माळगी याला उचलून जमिनीवर आपटल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. यामध्ये लाईनमन जखमी झाला. लाईनमन संघटनेचे पदाधिकारी, तसेच हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात हजर होते.









